कोल्हापूर, 11 ऑक्टोबर (हिं.स.)। शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ दिव्यांगांपर्यंत पोहोचवून त्यांचे जीवन सुसह्य करावे, असे आवाहन कोल्हापूरच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा कविता अग्रवाल यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विशेष शिबिरात त्या बोलत होत्या. या शिबिराचे आयोजन उच्च न्यायालयाच्या बालन्याय समिती, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, कोल्हापूर महानगरपालिका, छत्रपती प्रमीलाराजे सर्वोपचार रुग्णालय आणि जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
या प्रसंगी जिल्हाधिकारी अमोल येडगे, महानगरपालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेएन एस, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरजकुमार, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव दिपाली डोईफोडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कविता अग्रवाल म्हणाल्या, दिव्यांगांसाठी राबविल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. या शिबिरात वितरित केलेले साहित्य त्यांचे जीवन सुलभ करेल. शिक्षण आणि प्रोत्साहनाद्वारे दिव्यांगांना स्वावलंबी बनवण्याची गरज आहे. त्यांचा आत्मविश्वास आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची जिद्द आपल्याला प्रेरणा देणारी आहे. त्यांनी स्वप्नांचा पाठपुरावा आणि आई-वडिलांचे मार्गदर्शन यशासाठी महत्त्वाचे असल्याचेही सांगितले. यावेळी त्यांनी दिव्यांगांसाठीच्या कायद्यांबाबतही माहिती दिली.
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले की, जिल्ह्यातील 50 हून अधिक दिव्यांग खेळाडूंनी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर यश मिळवले आहे. पालकांच्या चांगल्या संस्कारांमुळे आणि शासनाच्या योजनांमुळे हे यश शक्य झाले, असे ते म्हणाले. महानगरपालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी सांगितले की, महानगरपालिकेतर्फे दिव्यांगांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. स्वनिधीतून दिव्यांग भवन बांधण्याचे नियोजन आहे, ज्यामुळे त्यांच्या समस्यांचे निराकरण सुलभ होईल, असे त्यांनी नमूद केले.
शिबिरात विशेष प्राविण्य मिळवलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. युडीआयडी ओळखपत्र, पालकत्व प्रमाणपत्र, शिष्यवृत्ती प्रमाणपत्र, श्रवणयंत्र आणि शैक्षणिक सहसाहित्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते झाले. समाज कल्याण, जिल्हा परिषद, महानगरपालिका, शिवाजी विद्यापीठ यांसह विविध विभागांचे 13 स्टॉल लावण्यात आले, जिथे योजनांची माहिती देण्यात आली. मान्यवरांनी स्टॉलना भेटी देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar