आ. महेंद्र थोरवेंनी दिले ७ मीटर रुंदीच्या रस्त्याचे आश्वासन
- १३७ कोटींचा निधी; पेशवाई रोड काँक्रीटीकरणाचे काम सुरु रायगड, 11 ऑक्टोबर (हिं.स.)। कर्जत तालुक्यातील दीर्घकाळ रखडलेले आणि नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले पेशवाई रोड काँक्रीटीकरणाचे काम अखेर मार्गी लागले आहे. दामत गेट ते आंबिवली गेट, साई मं
ग्रामस्थांच्या दीर्घ प्रतीक्षेला पूर्णविराम; आमदार थोरवे यांनी दिले ७ मीटर रुंदीच्या रस्त्याचे आश्वासन


- १३७ कोटींचा निधी; पेशवाई रोड काँक्रीटीकरणाचे काम सुरु

रायगड, 11 ऑक्टोबर (हिं.स.)। कर्जत तालुक्यातील दीर्घकाळ रखडलेले आणि नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले पेशवाई रोड काँक्रीटीकरणाचे काम अखेर मार्गी लागले आहे. दामत गेट ते आंबिवली गेट, साई मंदिर ते सुगावे आणि माथेरान गेट ते पोही गाव या तीन प्रमुख मार्गांच्या काँक्रीटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते संपन्न झाले. या कामासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) तर्फे तब्बल १३७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून या मार्गावरील खड्डेमय व दयनीय अवस्थेमुळे नागरिक, शेतकरी आणि विद्यार्थी यांना प्रवास करताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत होता. अनेक वेळा मागण्या करूनही हे काम रखडलेलेच राहिले होते. मात्र सरपंच महेश विरले, जोस्त्ना विरले आणि गोरख शेप यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अखेर या विकासकामाला मंजुरी मिळाली.

या कार्यक्रमात आमदार महेंद्र थोरवे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “या मार्गाचे काँक्रीटीकरण केवळ ५ मीटरऐवजी ७ मीटर रुंदीचे करण्याचे आदेश देण्यात येत आहेत. तसेच पाडा गेट परिसरात ओव्हरब्रिजचे काम हाती घेण्यात येईल,” असे आश्वासन त्यांनी दिले. त्यांनी पुढे सांगितले की, विकासकामांबाबत सरकार ठाम भूमिका घेत असून, नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही.

भूमिपूजन सोहळ्यास जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सुरेश टोकरे, अमर मिसाळ, स्थानिक ग्रामस्थ, महिला बचतगट सदस्य, युवक मंडळे आणि विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते. दीर्घ प्रतीक्षेनंतर हे काम मार्गी लागल्याने परिसरात आनंद आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या रस्त्यांच्या काँक्रीटीकरणामुळे वाहतूक व्यवस्था सुलभ होऊन परिसराच्या सर्वांगीण विकासाला गती मिळणार आहे, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande