जळगाव, 11 ऑक्टोबर (हिं.स.) जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील नुकसानीचे क्षेत्र लक्षात घेता शासनाने जळगाव जिल्ह्यातील संपूर्ण १५ तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर केला आहे. तर धुळे जिल्ह्यातील धुळे, साक्री, सिंदखेडा, शिरपूर आणि नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार, नवापुर, तळोदा, अक्राणी या तालुक्यांचाही समावेश आहे.
दरम्यान बाधित तालुक्यांसाठी पाच प्रकारच्या सवलतींची घोषणा करण्यात आली आहे. खान्देशात जून ते सप्टेंबर या कालावधीत १०० टक्केपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. तसेच सप्टेंबर महिन्यात तर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये अतिवृष्टीने कहर केला होता. त्यामुळे कापूस, केळी, मका या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. जळगाव जिल्ह्यात जवळपास दोन लाखाहून अधिक हेक्टर शेती क्षेत्राचे नुकसान झाले आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे.
दरम्यान राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्याच पंचनामे करण्यात आले. या पंचनाम्यांचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला होता. शुक्रवारी राज्याच्या महसूल व वनविभागाने राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये ओला दुष्काळाची घोषणा केली आहे. शासनाने जाहीर केलेल्या ओला दुष्काळात एरंडोल, पारोळा, धरणगाव, चोपडा, पाचोरा, जामनेर, जळगाव, भडगाव, अमळनेर, रावेर, चाळीसगाव, भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर आणि यावल अशा संपूर्ण १५ तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. ओला दुष्काळ जाहीर झालेल्या जिल्ह्यांसाठी पाच प्रकारच्या सवलती लागू करण्यात आल्या आहेत. यात जमीन महसूलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्ज वसुलीला वर्षभरासाठी स्थगिती, तिमाही विज बिलात माफी, परीक्षा शुल्कात माफी व १० आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी फी माफी अशा सवलतींचा लाभ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर