रत्नागिरी : कौशल्य विकास मार्गदर्शन केंद्रामार्फत स्पर्धा परीक्षार्थींसाठी वाचनालय
रत्नागिरी, 11 ऑक्टोबर, (हिं. स.) : जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत विद्यार्थ्यांसाठी वाचनालय सुरू करण्यात आले आहे. वाचनालयात विद्यार्थ्यांसाठी एक शांत, प
रत्नागिरी : कौशल्य विकास मार्गदर्शन केंद्रामार्फत स्पर्धा परीक्षार्थींसाठी वाचनालय


रत्नागिरी, 11 ऑक्टोबर, (हिं. स.) : जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत विद्यार्थ्यांसाठी वाचनालय सुरू करण्यात आले आहे.

वाचनालयात विद्यार्थ्यांसाठी एक शांत, प्रेरणादायी आणि अभ्यासासाठी अनुकूल वातावरण उपलब्ध असून, सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालू असलेल्या या अभ्यासिकेचा विद्यार्थी आणि करिअरसाठी सज्ज होणाऱ्या युवकांनी लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन प्र. सहायक आयुक्त मो. ए. दुधाळ यांनी केले आहे.

वाचनालयाची सुविधा पूर्णतः मोफत असून या वाचनालयामध्ये एमपीएससी, यूपीएससी, पोलीस भरती, स्टाफ सिलेक्शन कमिशन, बँकिंग अशा विविध स्पर्धापरीक्षांसाठी आवश्यक असलेल्या दर्जेदार व उपयुक्त पुस्तकांचा समावेश करण्यात आला आहे. ही सुविधा त्यांच्या अभ्यासात गती आणणारी आणि एकाच ठिकाणी सर्व संसाधनांची उपलब्धता देणारी आहे. योग्य जागा, आवश्यक साहित्य आणि एकाग्रतेस पूरक वातावरण या ठिकाणी सहजपणे अनुभवता येते. सर्व युवक व विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी या वाचनालयाचा पुरेपूर लाभ घ्यावा आणि आपली स्पर्धा परीक्षा तयारी अधिक बळकट करावी. शासनाच्या वतीने उपलब्ध करण्यात आलेल्या या सुविधा म्हणजे यशाकडे वाटचाल करण्याचे मजबूत पाऊल आहे, असे श्री. दुधाळ यांनी सांगितले.

योग्य मार्गदर्शन आणि दर्जेदार ग्रंथसंपदा हे यशाचे मूलभूत घटक असून ते आता एका ठिकाणी सहज उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन आपल्या स्वप्नांकडे आत्मविश्वासाने वाटचाल करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

अधिक माहितीसाठी उमेदवारांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधावा.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande