रत्नागिरी, 11 ऑक्टोबर, (हिं. स.) : चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे प्रतिष्ठेचे वाङ्मयीन पुरस्कार जाहीर झाले आहेत. दापोली येथील ज्येष्ठ गजलकार प्रा. कैलास गांधी यांच्या हस्ते रविवारी (दि. १२ ऑक्टोबर) सायंकाळी ६ वाजता वाचनालयात बाळशास्त्री जांभेकर सभागृहात पुरस्कार प्रदान समारंभ होईल.
कविवर्य द्वारकानाथ शेंड्ये, कविवर्य माधव केशव काटदरे आणि कविवर्य वि. ल. बरवे ऊर्फ कवी आनंद यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे पुरस्कार प्रदान केले जातात. कविवर्य द्वारकानाथ शेंड्ये मृदंगी काव्य पुरस्कार जामिनावर सुटलेला काळा घोडा या कवितासंग्रहासाठी धनाजी घोरपडे (बहादूरवाडी, सांगली) यांना, कविवर्य द्वारकानाथ शेंड्ये समीक्षा पुरस्कार वृत्तबद्ध कविता ते गझल तंत्र आणि मंत्र विजय जोशी (डोंबिवली) यांना, कविवर्य द्वारकानाथ शेंड्ये कादंबरी पुरस्कार ऊसकोंडी या कादंबरीसाठी डॉ. श्रीकांत पाटील (घुणकी, हातकणंगले, कोल्हापूर) यांना, कथासंग्रहासाठीचा कवी माधव पुरस्कार कथा विविधा या कथासंग्रहासाठी प्रा. सुहास बारटक्के (चिपळूण) यांना, कथासंग्रहासाठीचा कवी आनंद पुरस्कार शापित हवेली या कथासंग्रहासाठी अविनाश बापट (हिंदळे, देवगड) यांना प्रदान करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, कार्यवाह धनंजय चितळे, कार्याध्यक्ष अरुण इंगवले यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी