- मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या सन्मानार्थ, गर्भाशय मुख कर्करोग जागरूकता
मुंबई, 11 ऑक्टोबर (हिं.स.) - राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या (एनएसजी) 26 व्या विशेष संमिश्र गटाने (एससीजी) 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात शौर्य दाखवणारे अशोक चक्र प्राप्त मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मुंबईत रविवार, 12 ऑक्टोबर रोजी सायक्लोथॉनचे आयोजन केले आहे. गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविषयी जनजागृती करणे तसेच फिट इंडिया अभियानाला प्रोत्साहन देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. या सायक्लोथॉनद्वारे एनएसजी स्थापनादिन साजरा करण्याच्या कार्यक्रमांची औपचारिक सुरुवात होणार आहे. सायक्लोथॉन सकाळी 7 वाजता मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथून सुरू होईल आणि शहरातून 100 किलोमीटर अंतर पार करेल. या कार्यक्रमात 250 हून अधिक व्यावसायिक सायकलस्वार एनएसजी चे जवान सहभागी होतील. या सहभागातून शारीरिक तंदुरुस्ती, एकता, शिस्त आणि राष्ट्रीय कर्तव्याची सामायिक भावना दर्शविली जाईल.
या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविषयी जागरूकतेसाठी विशेष रूपाने तयार करण्यात आलेली दोन पथनाट्य प्रमुख ठिकाणी सादर केले जातील. जनजागृती कार्यक्रमात जनतेला संवादात्मक आणि सोप्या पद्धतीने सहभागी करून घेणे, तसेच महिलांच्या आरोग्यविषयक समस्यांविषयी आणि प्रतिबंधात्मक उपायांविषयी जागरूकता वाढवणे हा या पथनाट्यांचा उद्देश आहे.
याव्यतिरिक्त, 13 आणि 14 ऑक्टोबर रोजी एनएसजी वैद्यकीय पथके मुंबईतील शाळांना भेट देतील. ही पथके या शाळा भेटीत विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी तंदुरुस्ती, प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा, गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविषयी जागरूकता आणि स्वच्छतेचे महत्व या विषयांवर संवादात्मक सत्रे आयोजित करतील.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी