नाशिक, 11 ऑक्टोबर, (हिं.स.)। शहरातील वाढत्या वाहतूके कोंडीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून मध्य नाशिक मतदारसंघाच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत तीन महत्त्वपूर्ण प्रस्ताव सादर केले आहेत.
शहराच्या झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे रस्त्यांवरील ताण वाढला असून, आगामी सिंहस्थ पर्वणीदरम्यान ही समस्या गंभीर होऊ शकते, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले. निवेदनात गंगापूर रोडला समांतर असा सुयोजित गार्डन ते वृंदावन लॉन्स हा २४ मीटर रुंदीचा नवा रस्ता तयार करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या रस्त्यामुळे आनंदवल्ली ते गंगापूर नाका वाहतूक मोठ्या प्रमाणात
सुरळीत होईल. दुसऱ्या प्रस्तावात विद्या विकास सर्कल ते मखमलाबाद रोडदरम्यान गोदावरी नदीवर पूल उभारण्याची मागणी करण्यात आली आहे, ज्यामुळे गंगापूर रोडवरील ट्रॅफिकचा ताण कमी होईल.
तिसऱ्या प्रस्तावात सिटी सेंटर मॉल ते गोविंदनगरदरम्यान उड्डाणपूल उभारण्याची गरज नमूद केली आहे. सातपूर आणि अंबड एमआयडीसीकडून नाशिकरोडला जाणारी वाहतूक या मार्गाने होत असल्याने दररोज कोंडी निर्माण होते. या भागातील नव्याने उभ्या राहणाऱ्या इमारतींमुळे समस्या अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. या सर्व कामांना सिंहस्थपूर्वी गती द्यावी, अशी आग्रही मागणी आमदार फरांदे यांनी केली आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV