कोल्हापुरात ‘नशामुक्त’ रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद : रन अँड वॉक यशस्वी
कोल्हापूर, 11 ऑक्टोबर (हिं.स.)। कोल्हापूरच्या पोलीस परेड मैदानावर आज सकाळी ६:३० वाजता रन अँड वॉक च्या माध्यमातून उत्साहाचा धबधबा अवतरला. जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेल्या नशामुक्त भारत अभियान अंतर्गत ‘नशामुक्त कोल्हापूर’ या रन-वॉक रॅलीत ६ ते ६० वय
नशामुक्त कोल्हापूर’ साठी रन-वॉक रॅली


कोल्हापूर, 11 ऑक्टोबर (हिं.स.)। कोल्हापूरच्या पोलीस परेड मैदानावर आज सकाळी ६:३० वाजता रन अँड वॉक च्या माध्यमातून उत्साहाचा धबधबा अवतरला. जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेल्या नशामुक्त भारत अभियान अंतर्गत ‘नशामुक्त कोल्हापूर’ या रन-वॉक रॅलीत ६ ते ६० वयोगटातील तब्बल ५ हजारांहून अधिक बालक, महाविद्यालयीन विद्यार्थी, वयोवृद्ध नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला. या रॅलीला जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी हिरवा झेंडा दाखवत शुभारंभ केला.

या रॅलीचा मार्ग पोलीस परेड ग्राऊंड (कसबा बावडा) येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आणि पुन्हा परत पोलीस परेड ग्राऊंड असा होता. ही दौड सर्व वयोगटांसाठी खुली आणि मोफत होती. आरोग्य, फिटनेस आणि नशाबंदीचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यापूर्वी २८ सप्टेंबर रोजी अतिवृष्टीमुळे ही रॅली रद्द झाली होती, ती आज यशस्वीपणे पूर्ण झाली.

रॅलीपूर्वी शाहीर डॉ. आजाद नाईकवाडी यांच्या महाराष्ट्र गीताने आणि निवेदक गायत्री कुलकर्णी यांच्या निवेदनाने स्पर्धकांचा उत्साह द्विगुणित झाला. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कोल्हापूरच्या समृद्ध क्रीडा संस्कृतीचे कौतुक करत, युवकांनी ती जोपासावी आणि नशामुक्तीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन केले. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी रात्रीच्या मित्रांऐवजी सकाळचे मित्र जोडा असा मार्मिक सल्ला दिला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थितांना नशामुक्तीची शपथ दिली.

या प्रसंगी अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, सहाय्यक पोलीस अधीक्षक धीरज कुमार, मनपा अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, बाबासाहेब वाघमोडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. रॅलीत जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, क्रीडा व सामाजिक संघटना तसेच प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले.

या रॅलीने कोल्हापूरच्या नशामुक्तीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले असून, नागरिकांमध्ये नशाबंदी आणि आरोग्याबाबत जागरूकता निर्माण झाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande