धाराशिव, 12 ऑक्टोबर (हिं.स.)।
धाराशिव पंचायत समिती सदस्य पदाचे आरक्षण १३ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहे.धाराशिव तालुक्यातील पंचायत समिती सदस्य पदाच्या सन २०२५-२०३० या कालावधीसाठीचे आरक्षण निश्चित करण्याची प्रक्रिया १३ ऑक्टोबर रोजी होणार आहे. ही घोषणा तहसीलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी, डॉ. मृणाल जाधव यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
जिल्हाधिकारी, धाराशिव यांच्या सूचनेनुसार, सदस्य पदाचे आरक्षण सोडत पद्धतीने (ड्रॉ लॉट्स) काढण्यात येणार आहे. हा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात सकाळी ११ वाजता सुरू होईल.
ही आरक्षण प्रक्रिया महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ आणि संबंधित नियम २०२५ मधील तरतुदींनुसार पार पडेल. या सोडतीद्वारे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, तसेच या प्रवर्गांमधील महिला आणि सर्वसाधारण महिलांसाठी राखीव जागा निश्चित केल्या जातील.
या सोडतीच्या सभेस उपस्थित राहण्याची इच्छा असणाऱ्या पंचायत समिती क्षेत्रातील रहिवाशांनी दिलेल्या वेळेत आणि ठिकाणी उपस्थित राहावे, असे आवाहन तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis