धाराशिव, 12 ऑक्टोबर (हिं.स.)। तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा परिसरात राबविण्यात येणाऱ्या “तुळजाई कृषी महसूल-वाढ अभियान अर्थात तारा (TARA)” प्रकल्पाच्या अंमलबजावणीला आता चांगली गती मिळाली आहे. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या जगप्रसिद्ध ग्रँट थॉर्टन भारत एलएलपी संस्थेच्या पथकाने स्थळ पाहणी केली.
'ग्रँट थॉर्टन'च्या पथकाने माळुंब्राजवळील १००० एकर प्रकल्प क्षेत्राचा आढावा घेतला. स्थानिक पिकपद्धती, मातीची गुणवत्ता, पाण्याची उपलब्धता तसेच कृषी उत्पादक कंपन्यांच्या (FPOs) कार्याचा अभ्यास केला. तसेच या भागातील शेतकरी प्रतिनिधींशी संवाद साधून कृषिआधारित उद्योगांची संभाव्यताही जाणून घेतली. , या ठिकाणी तरुण शेतकऱ्यांना १० ते २० गुंठ्यांचे प्लॉट्स देऊन त्यांना प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, अशी सूचना महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशनचे (मित्र) उपाध्यक्ष, तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी या पथकाला केली.
तारा प्रकल्प हा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक क्रांतिकारी पाऊल आहे. उत्पादनापासून ते प्रक्रियेपर्यंत, ब्रँडिंगपासून निर्यातीपर्यंत सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या प्रकल्पातून धाराशिव जिल्हा राज्यातील आदर्श कृषी जिल्हा ठरेल असा विश्वास आमदार पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. या प्रकल्पांतर्गत ५०० कृषिआधारित प्रक्रिया उद्योग आणि महिलांसाठी स्वतंत्र २०० उद्योग उभारण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सुमारे एक लाख शेतकरी बांधवांना या अभियानाशी जोडले जाणार आहे. शेतकऱ्यांना आर्थिक, तांत्रिक व विपणन साह्य देण्यात येणार असून, त्यांना हक्काची बाजारपेठ आणि हमीभाव उपलब्ध करून देणे हा देखील या प्रकल्पाचा प्रमुख उद्देश आहे.
------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis