पहिल्या अ‍ॅशेस कसोटीत खेळण्याची शक्यता कमी - पॅट कमिन्स
कॅनबेरा, १३ ऑक्टोबर (हिं.स.) ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने २१ नोव्हेंबरपासून पर्थ येथे सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या अ‍ॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटीत खेळण्याची शक्यता कमी असल्याचे संकेत दिले आहेत. कमिन्स सध्या पाठीच्या दुखापतीतून सावरत आहे आ
पॅट कमिन्स


कॅनबेरा, १३ ऑक्टोबर (हिं.स.) ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने २१ नोव्हेंबरपासून पर्थ येथे सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या अ‍ॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटीत खेळण्याची शक्यता कमी असल्याचे संकेत दिले आहेत. कमिन्स सध्या पाठीच्या दुखापतीतून सावरत आहे आणि अलीकडेच त्याने धावणे सुरू केले आहे.

सप्टेंबरच्या सुरुवातीला कमिन्सला पाठीत कमरेच्या हाडाच्या ताणाची समस्या असल्याचे निदान झाले होते. तेव्हापासून त्याने एकही चेंडू टाकलेला नाही. तो शेवटचा जुलैमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळला होता.

सोमवारी सिडनी येथे झालेल्या एका कार्यक्रमात कमिन्स म्हणाला, मी म्हणेन की, पहिल्या कसोटीत खेळण्याची शक्यता कमी आहे. पण अजूनही काही वेळ शिल्लक आहे. मी आज आणि प्रत्येक दिवशी धावत आहे. मी पुढच्या आठवड्यात गोलंदाजीची तयारी सुरू करेन. मी कदाचित दोन आठवड्यांत नेटमध्ये परत येईन, स्पाइक्स घालून.

तो म्हणाला, कसोटी क्रिकेटसाठी तुमच्या शरीराला पूर्णपणे तयार करण्यासाठी किमान एक महिना लागतो. जर तुम्हाला कसोटी सामना खेळायचा असेल, तर तुम्हाला दररोज २० षटके टाकण्यासाठी तयार राहावे लागेल. चार आठवडे हा खूप कमी वेळ आहे, पण ते शक्य आहे.

कमिन्सने कबूल केले की धावण्यापासून गोलंदाजीकडे संक्रमण हळूहळू होईल. त्याला विशिष्ट जिम काम करण्यासाठी आणि त्याचे शरीर तयार करण्यासाठी वेळ लागेल.तो म्हणाला, आता वेदना होत नाहीत, मी हळूहळू माझे काम वाढवत आहे जेणेकरून माझे शरीर योग्यरित्या प्रतिसाद देईल.

ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते की, कमिन्सच्या उपलब्धतेबद्दल निर्णय शुक्रवारी घेतला जाऊ शकतो. कमिन्सने पहिली कसोटी गमावली तरी अ‍ॅशेस मालिकेत तो कधीतरी परत येईल असा प्रशिक्षकांना विश्वास आहे.

कमिन्स म्हणाला की, दुखापतीमुळे तो निराश आहे पण भविष्याबद्दल आशावादी आहे.तो म्हणाला, ही दुखापत सात-आठ वर्षांनी मला झाली आहे. मला माहित आहे की, एकदा मी बरा झालो की, ती मला जास्त काळ त्रास देणार नाही. येत्या काळात मी अधिक क्रिकेट खेळेन अशी आशा आहे.

अ‍ॅशेस मालिकेतील पहिली कसोटी २१ नोव्हेंबरपासून पर्थमध्ये खेळली जाईल. कमिन्सच्या अनुपस्थितीत, वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड आणि मिशेल स्टार्क यांच्यावर अतिरिक्त जबाबदाऱ्या येण्याची शक्यता आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande