छ. संभाजीनगर जिल्हा कुपोषणमुक्तीसाठी जिल्हाधिकाऱ्यांची पंचसूत्री
६५१ बालकांना १४ नोव्हेंबर पर्यंत कुपोषणाच्या विळख्यातून बाहेर काढणार छत्रपती संभाजीनगर, 14 ऑक्टोबर (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ६५१ बालके कुपोषण श्रेणीत आहेत. या सर्व बालकांना येत्या १४ नोव्हेंबर पर्यंत कुपोषणाच्या विळख्यातून बाहेर काढून
अ


६५१ बालकांना १४ नोव्हेंबर पर्यंत कुपोषणाच्या विळख्यातून बाहेर काढणार

छत्रपती संभाजीनगर, 14 ऑक्टोबर (हिं.स.)।

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ६५१ बालके कुपोषण श्रेणीत आहेत. या सर्व बालकांना येत्या १४ नोव्हेंबर पर्यंत कुपोषणाच्या विळख्यातून बाहेर काढून जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज पंचसूत्री दिली आहे. त्यानुसार महिला व बालविकास, आरोग्य, ग्रामविकास व महसूल यंत्रणांनी समन्वयाने काम करुन जिल्हा कुपोषण मुक्त करावा,असे निर्देश जिल्हाधिकरी स्वामी यांनी आज दिले.

महिला बालविकास विभाग, आरोग्य विभाग, महसूल विभाग आणि ग्रामविकास विभाग या यंत्रणांच्या ग्राम, तालुका, उपविभाग व जिल्हास्तरीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांशी आज जिल्हाधिकाऱ्यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे संवाद साधला. निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यावेळी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले की, जिल्ह्यात ६५१ बालके कुपोषित श्रेणीत येतात.

छत्रपती संभाजीनगर-८०, कन्नड-२८, फुलंब्री ६१, सिल्लोड-९५, सोयगाव-६०, गंगापूर-१००, पैठण-१२८, वैजापूर-३८, खुलताबाद-६१ याप्रमाणे कुपोषित बालकांची संख्या आहे. या सर्व बालकांना कुपोषण श्रेणीतून बाहेर काढण्यासाठी बालदिन म्हणजेच १४ नोव्हेंबर पर्यंतचा कालबद्ध कार्यक्रम देण्यात आला.

दि.१६ ऑक्टोंबर रोजी गावातील कुपोषित बालकांची नोंद घेऊन ही बालके संबंधित अधिकारी, कर्मचारी यांनी दत्तक घेणे; त्यांच्या आहार, आरोग्य विषयक दैनंदिन घडामोडींवर लक्ष ठेवणे.

दि.१७ ऑक्टोंबर रोजी स्वच्छता दिवस पाळून बालकांच्या आरोग्यकारक स्वच्छतेविषयी त्यांच्या पालकांना माहिती देणे. दि.२८ ऑक्टोंबर रोजी गावातील मान्यवरांच्या हस्ते बालकांचा पौष्टिक खाऊ देणे.

दि.३ व ४ नोव्हेंबर रोजी प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत बालकांची आरोग्य तपासणी करणे.

दि.७ नोव्हेंबर रोजी पालकांचे समुपदेशन मेळावे घेऊन त्यांना बालकांना द्यावयाचा आहार, पोषणमुल्य युक्त अन्न, आरोग्याची काळजी, वैयक्तिक स्वच्छता इ.बाबत मार्गदर्शन करणे.

याप्रमाणे कालबद्ध व उद्दिष्टाधारीत प्रयत्न करुन दि.१४ नोव्हेंबर बाल दिन यादिवशी जिल्ह्यातील ही सर्व ६५१ बालके कुपोषण श्रेणीतून बाहेर आणण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande