आंदोलक आईच्या मृतदेहासह मुलीचे आंदोलन
अमरावती, 14 ऑक्टोबर (हिं.स.) न्याय मिळावा यासाठी तब्बल सहा महिन्यांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या जेष्ठ नागरिक शांता अठोर यांचे सोमवारी (ता. १३) निधन झाले. त्यांच्या निधनानंतर मुलगी विजया उकर्ड अठोर (आठवले) यांनी आईचा (शांता अठोर) मृतदेह थेट जिल्हाकचेरी परिसरातील आंदोलनस्थळी आणला. संबंधितांवर जोपर्यंत कारवाई होणार नाही, तोपर्यंत मृतदेहासह आंदोलन करणार असल्याचा इशारा विजया अठोर यांनी दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात संबंधित अधिकाऱ्यांवर व आमदार खोडके दांपत्यासह माजी नगरसेवक अविनाश मार्डीकर यांच्यावर गंभीर आरोप करत कारवाईची मागणी विजया अठोर यांनी केली आहे.
मनपामधील अनुकंपा नोकरी सावत्र मुलगा सागर याला बेकायदेशीरपणे देण्यात आली. तसेच शांताबाईचे घरकुल हडपल्याचा आरोप करीत २८ एप्रिल २०२५ पासून शांताबाई अठोर व विजया अठोर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते. जेष्ठ नागरिक शांता अठोर, सहा महिन्यांपासून न्यायासाठी संघर्ष करीत होत्या. मात्र या काळात कोणत्याही अधिकाऱ्यांनी मागण्यांकडे लक्ष दिले नाही. दरम्यान शांताबाई दोनदा आजारी पडल्या तरी प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. अखेरीस सोमवारी १३ ऑक्टोबरला शांताबाई यांचे निधन झाले, असे विजया अठोर यांनी सांगितले. शांताबाई यांच्या मृत्यूला प्रशासन व संजय खोडके, सुलभा खोडके व अविनाश मार्डीकर जबाबदार असल्याने त्यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हे दाखल करावेत. जिल्हाधिकारी आशिष येरेकर, उपजिल्हाधिकारी भटकर, पोलीस आयुक्त अरविंद चावरीया व मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांच्यावरसुद्धा कारवाईची मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे. याशिवाय सागर अठोर, आंकाश अठोर व कुंता अठोर यांना त्वरीत अटक करण्यात यावी, अशी मागणी विजया अठोर यांनी केली आहे. शांताबाई अठोर यांची अंत्ययात्रा बेनोडा येथील त्यांच्या स्वतःच्या घरातून काढण्यात येणार असून त्या घरातील सर्वांनी ते ठिकाण रिकामे करावे, अशीही मागणी करण्यात आली आहे. वडिलांच्या अनुकंपा नोकरी त्वरित देण्यात यावी, माझी आई ज्या जागेवर आंदोलन करीत होती, त्याच ठिकाणी तिचा मृतदेह आहे. माझा जीव गेला तरी मी त्या ठिकाणावरून मृतदेह हलविणार नाही, असे विजया अठोर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी