रायगड, 16 ऑक्टोबर (हिं.स.)।
ग्रामीण भागातील आरोग्यव्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या आशा सेविकांना गेल्या काही महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही. या अन्यायाविरोधात शेतकरी कामगार पक्ष आक्रमक झाला असून, “दिवाळीपूर्वी मानधन द्या, अन्यथा तीव्र आंदोलन उभारू,” असा इशारा शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी दिला आहे.
अलिबाग येथील शेतकरी भवनमध्ये आशा सेविकांच्या मानधनासह प्रलंबित मागण्यांबाबत पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी आशा सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. चित्रलेखा पाटील म्हणाल्या, “कोरोना काळात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या आशा सेविकांना शासनाकडून आजही मानधनासाठी दरदर फिरावे लागते, ही मोठी शोकांतिका आहे.”
रायगड जिल्ह्यात दीड हजारांहून अधिक आशा सेविका कार्यरत आहेत. माता-बालक आरोग्य, लसीकरण, जन्म-मृत्यू नोंदणी, आयुष्मान योजना प्रसार अशा अनेक जबाबदाऱ्या त्या पार पाडतात. मात्र, जून महिन्यापासून त्यांना मानधन मिळालेले नाही. केंद्राकडून जून ते सप्टेंबर तर राज्याकडून ऑगस्ट-सप्टेंबर या दोन महिन्यांचे मानधन थकले आहे.
“गणेशोत्सव, नवरात्री सण मानधनाशिवाय गेले, आणि आता दिवाळीही अशाच परिस्थितीत साजरी करावी लागेल,” अशी खंत आशा सेविका अनुराधा गायकवाड यांनी व्यक्त केली.
दरम्यान, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा विखे यांनी सांगितले की, काही तांत्रिक कारणांमुळे मानधन रखडले असले तरी दिवाळीपूर्वी आशा सेविकांना मानधन मिळण्याची शक्यता आहे व त्यासाठी हालचाली सुरू आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके