रत्नागिरी, 16 ऑक्टोबर, (हिं. स.) : रत्नागिरीत उभारण्यात आलेल्या कोकणातील सहा भारतरत्नांच्या शिल्पांचे अनावरण आज (१६ ऑक्टोबर) राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.
शहरातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगणाच्या प्रांगणात ही शिल्पे उभारण्यात आली असून, मोडीत काढलेल्या वाहनांच्या सुट्या भागांपासून जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी ती साकारली आहेत. महिलांचे शिक्षण आणि हक्क यांसाठी झटलेले महर्षी धोंडो केशव कर्वे, महामहोपाध्याय डॉ. पां. वा. काणे, भूदान चळवळीचे प्रणेते विनोबा भावे, राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर आणि क्रिकेटचा देव अशी ओळख असलेले मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या सहा भारतरत्नांच्या शिल्पांचा त्यात समावेश आहे. उपमुख्यमंत्र्यांनी शिल्पांचे उद्घाटन केले, तरी त्यांनी तेथे कोणतेही वक्तव्य केले नाही.
कार्यक्रमाला पालकमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, रत्नागिरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी वैभव गारवे, आमदार किरण सामंत, दीपक केसरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कोकणाने सर्वाधिक सहा भारतरत्ने देशाला दिली आहेत. त्यांचा आदर्श इथल्या विद्यार्थ्यांसमोर राहावा आणि त्यांनी त्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी, या उद्देशाने या भारतरत्नांची भव्य शिल्पे उभारली असून, हा कार्यक्रम महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत केला जात आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी केलं. ज्या भारतरत्नांची शिल्पे उभारण्यात आली आहेत, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास विद्यार्थ्यांनी करावा आणि त्यांच्यासारखेच महान कार्य करण्याची प्रेरणा घ्यावी, असे सामंत म्हणाले.
जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे प्राध्यापक शशिकांत काकडे आणि विजय बोंदर यांच्या मार्गदर्शनाखाली १५ विद्यार्थ्यांनी नऊ महिने अहोरात्र कष्ट करून २५ टन 'ऑटोमोबाइल वेस्ट'पासून ही शिल्पे साकारली आहेत. अशा प्रकारचा हा देशातला पहिलाच उपक्रम असल्याचे सांगतानाच या विद्यार्थ्यांची जिद्द आणि चिकाटी यांचाही आदर्श इथल्या स्थानिक विद्यार्थ्यांनी घ्यावा, असेही आवाहन सामंत यांनी केले. रत्नागिरी हे शैक्षणिक केंद्र म्हणून विकसित होत असून, पुढच्या वर्षी पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालय आणि सागरी विद्यापीठही रत्नागिरीत सुरू होणार असल्याचे सामंत यांनी नमूद केले. इतिहास, संस्कृती, पर्यावरण आणि कलात्मकता यांचा संगम या शिल्पांमुळे झाला असून, रत्नागिरीच्या पर्यटनात भर पडणार असल्याचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी सांगितले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज रत्नागिरी जिल्ह्यातल्या शिवसेनेच्या तीन हजार बूथप्रमुखांना मेळाव्यात मार्गदर्शन केले. 'विरोधकांना त्यांचा पराभव समोर दिसू लागला आहे. आधी 'निवडणुका लवकर घ्या' म्हणत होते, आता 'पुढे ढकला' असे म्हणत आहेत. हे सगळे एकत्र येऊन त्यांना विजयाची खात्री नाही, म्हणून ते असे म्हणत आहेत. त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. म्हणूनच त्यांचा हा रडीचा डाव सुरू आहे. कितीही विरोधक एकत्र आले तरीसुद्धा महायुतीचाच भगवा फडकेल, असे प्रतिपादन शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना केले. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री योगेश कदम, आमदार नीलेश राणे, आमदार दीपक केसरकर, राजन साळवी यांच्यासह अनेक शिवसेना नेते, पदाधिकारी उपस्थित होते. रत्नागिरी शहरातील शिवसेना कार्यालयातल्या धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता केंद्राचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते झाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी