नांदेड, 16 ऑक्टोबर, (हिं.स.)। नांदेड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्यावतीने जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी किरण अंबेकर यांच्या नियंत्रणाखाली राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) 5 वी बटालियन, पुणे यांच्यामार्फत मौजे काळेश्वर, विष्णुपुरी येथे आपत्ती व्यवस्थापनाबाबत प्रशिक्षण व सराव सत्र यशस्वीरीत्या पार पडले.
या प्रशिक्षणासाठी कमांडर रविंद्र कांबळे यांच्या नेतृत्वाखालील 17 जणांच्या दलाने सहभाग घेतला. जिल्ह्यातील सर्व 16 तालुक्यांतील तहसील, पंचायत, पोलीस, मनपा, नगरपरिषद, कृषी आदी विविध विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी सकाळ व दुपार अशा दोन सत्रांत हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
भूकंप, पूर आदी आपत्ती प्रसंगी स्वतःचा बचाव कसा करायचा तसेच शोध व बचाव कार्याची अंमलबजावणी कशी करायची याबाबत प्रत्यक्ष हाताळणीसह जवळपास 700 अधिकारी-कर्मचाऱ्यांना दोन सत्रात प्रशिक्षण देण्यात आले. नदीकाठच्या पूरप्रवण गावांतील स्थानिक कर्मचारी, मुखेड तालुक्यातील मुक्रामाबाद, लोहा तालुक्यातील माळाकोळी पोलीस स्टेशन क्षेत्रातील पोलीस पाटील, महसूल कर्मचारी तसेच हिमायतनगर येथील नायब तहसीलदार आणि माजी सैनिक हयुम पठाण यांनी त्यांच्या टीमसह सक्रीय सहभाग नोंदवला.
या प्रशिक्षणास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुऱ्हे, सर्व तालुक्यांतील नायब तहसीलदार, महसूल, कृषी विभागाचे अधिकारी, सहाय्यक अग्नीशमन अधिकारी निलेश काबळे यांच्यासह मनपाचे अग्नीशमन तसेच शोध व बचाव पथक उपस्थित होते.
शोध व बचाव कार्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांचा परिचय, सी.पी.आर. पद्धती, आय.आर.बी. रबरी बोटची तयारी व वापर या विषयांवर सविस्तर प्रशिक्षण व सराव देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बारकुजी मोरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन पोलीस पाटील प्रविण हंबरडे, विष्णुपुरी यांनी मानले.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्यावतीने जिल्हृयात आपत्ती व्यवस्थापनाचे विविध ठिकाणी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आले. या प्रशिक्षणात जिल्ह्यात शाळा-महाविद्यालये, पुरप्रवण गावे, होमगार्ड, मनपा, एन.सी.सी., एन.एस.एस., आपदा मित्र, शासकीय अधिकारी-कर्मचारी, शिक्षक व विद्यार्थी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis