परभणी, 16 ऑक्टोबर, (हिं.स.)।
येथील सोशल एम्पॉवरमेंट अॅण्ड व्हालंटरी असोसिएशन आणि गुंज संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने परभणी जिल्ह्यातील विविध गावांमध्ये पूरग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक साहित्य कीटचे वाटप करण्यात आले.
अलीकडील अतिवृष्टीमुळे अनेक भागांतील नागरिकांचे मोठे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर संस्थेने तातडीने मदतकार्य हाती घेतले. या उपक्रमांतर्गत एकूण 9 गावांमध्ये 501 कुटुंबांना आणि 300 विद्यार्थांना मदत पोहोचविण्यात आली. या कीटमध्ये अन्न-धान्य, आवश्यक घरगुती वस्तू, कपडे तसेच स्वच्छतेसाठी लागणारे साहित्य समाविष्ट होते. स्थानिक स्वयंसेवक, ग्रामपंचायतींचे प्रतिनिधी आणि संस्था कार्यकर्त्यांच्या सहकार्याने ही मोहीम यशस्वीरीत्या पार पडली.
दरम्यान, आपत्तीच्या काळात प्रत्येकाने मानवीतेच्या भावनेतून मदतीचा हात पुढे करणे आवश्यक आहे. सेवा आणि गुंज संस्थेचा प्रयत्न हाच आहे की प्रत्येक गरजू कुटुंबापर्यंत मदतीचा किरण पोहोचावा, असे मत संस्थेचे कार्यकर्ते मुंजाजी कदम तसेच सुदाम शिंदे यांनी व्यक्त केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis