रायगड, 16 ऑक्टोबर (हिं.स.)।
भारतीय जनता पार्टी पनवेल आणि रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेतून ‘दीपोत्सव २०२५ – दिवाळी संध्या’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. संगीत, संस्कृती आणि आनंदाचा संगम घडविणाऱ्या या कार्यक्रमातून पनवेल महानगरातील नागरिकांना सुरेल सुरांच्या मेजवानीचा आनंद घेता येणार आहे.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दीपोत्सव संगीत महोत्सवाचे आयोजन पनवेल, खारघर, कळंबोली आणि कामोठे या ठिकाणी करण्यात आले आहे. दिवाळीच्या मंगल वातावरणात आयोजित या कार्यक्रमांत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक-गायिका रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहेत.
दि. १८ ऑक्टोबर रोजी खारघर येथे आणि १९ ऑक्टोबर रोजी कळंबोली येथे सायं. ६:३० वाजता महाराष्ट्राचे लोकप्रिय गायक स्वप्नील बांदोडकर आणि प्रसिद्ध गायिका गुल सक्सेना आपल्या सुरेल सादरीकरणाने रंग जमवणार आहेत. तर २१ ऑक्टोबर रोजी पहाटे ५:३० वाजता गायिका बेला शेंडे यांची “दिवाळी पहाट” मैफल पनवेल येथे रंगणार आहे. यानंतर २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी कामोठे येथे “सारेगम फेम” आर्या आंबेकर आपल्या सुरेल गायनाने श्रोत्यांना भावविभोर करणार आहेत.
महाराष्ट्रात “दिवाळी पहाट” या सांस्कृतिक परंपरेला विशेष स्थान आहे. त्याच परंपरेचा वारसा जपत दीपोत्सव २०२५ या कार्यक्रमाद्वारे संगीत आणि सणाचा आनंद एकत्र अनुभवण्याची संधी पनवेलकरांना मिळणार आहे. आयोजकांच्या वतीने सर्व नागरिकांना या भव्य कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके