लातूर, 16 ऑक्टोबर (हिं.स.)। राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ट्वेंटीवन ॲग्री लिमिटेडच्या संचालिका सौ. अदितीताई अमित देशमुख यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या 'महिला उद्योजिका व्ही.डी.एफ. बाजाराला' लातूर शहर व जिल्ह्यातील ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
लातूर शहरातील जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित या दोन दिवसीय बाजारात महिला उद्योजिकांनी तयार केलेल्या वस्तूंची लाखो रुपयांची खरेदी ग्राहकांनी केली. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेला हा 'महिला उद्योजिका व्हीडीएफ बाजार' एक स्तुत्य उपक्रम ठरला. या बाजारातून महिलांनी तयार केलेल्या गृह उपयोगी वस्तू, खाद्यपदार्थ, हस्तकला, मसाले, तयार कपडे आणि विविध प्रकारचे दिवाळी साहित्य यांची विक्री करण्यात आली.या बाजाराच्या माध्यमातून महिला उद्योजकांना त्यांच्या उत्पादनांची विक्री करण्यासाठी एक मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले. व्हीडीएफ बाजाराच्या निमित्ताने विलासराव देशमुख फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेला 'जागर लोककलेचा' कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. शाहीर तुकाराम सुवर्णकार, शाहीर मनोज शिवलकर, राहुल खुदासे यांच्या टीमने भक्तीगीत, शिवगीत, पोवाडा, गोंधळ, भारुड, लोकगीते आदी कलाप्रकार सादर करून नागरिकांची मने जिंकली. नागरिकांनीही टाळ्यांच्या कडकडाटात या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाला आणि बाजाराच्या यशस्वीतेसाठी विलासराव देशमुख फाउंडेशनच्या समन्वयक संगीता मोळवणे, प्रीतम जाधव, डॉ. अभय कदम, डॉ. ज्योती सूळ, सोनाली थोरमोठे पाटील, उर्मिला मुगळे, शितल फुटाणे, खाजाबानू अन्सारी, सोशल प्लॅनर गजानन बोयणे यांच्यासह महिला बचत गटाचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis