नाशिक , 16 ऑक्टोबर (हिं.स.)। आदिवासी विकास विभागाच्या आसरबारी शासकीय आश्रमशाळा ( ता. पेठ, जि. नाशिक) येथे ‘रविवार माझा आवडीचा’ या नाविन्यपूर्ण उपक्रम मालिकेच्या ६० व्या भागांतर्गत दिवाळी सणाच्या तयारीसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत विद्यार्थिनींनी आकाश कंदील आणि ग्रीटिंग कार्ड बनविण्याच्या कलेत आपली सर्जनशीलता दाखवली.
अधिक्षिका योगिता कराळे यांच्या संकल्पनेतून आसरबारी शासकीय आश्रमशाळेत ‘रविवार माझा आवडीचा’ उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत शालेय सुट्टीच्या दिवशी विद्यार्थ्यांना नुसत्या खेळात किंवा विश्रांतीत वेळ घालवण्याऐवजी त्यांना सांस्कृतिक, सामाजिक आणि व्यावहारिक शिक्षण दिले जाते. यंदाच्या ६० व्या भागात दिवाळी निमित्त आकाश कंदील, ग्रीटिंग बनविणे व दिवाळी साजरी करणे हा विषय निवडण्यात आला, ज्यामुळे विद्यार्थ्यांना दिवाळी सणाची तयारी करताना आनंदासह शिक्षण मिळाले. आकाश कंदील व ग्रीटिंग कार्ड्स बनविण्याच्या कार्यशाळेत सुमारे ६० विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला. त्यांनी रंगीत कागद, गोंद, कात्री, चमकणारे स्टिकर्स, रंग आणि इतर सजावटीच्या वस्तूंचा वापर करून आकर्षक आकाश कंदील तयार केले. प्रत्येक विद्यार्थिनीने आपल्या सर्जनशील कल्पनांचा वापर करून पारंपरिक तसेच आधुनिक डिझाईन्सचे कंदील बनवले. यासोबतच, विद्यार्थिनींनी दिवाळीच्या शुभेच्छा देणारी ग्रीटिंग कार्ड्स बनवली. या कार्ड्सवर त्यांनी रंगीत पेन, स्केच पेन आणि चमकणाऱ्या सजावटींचा वापर करून संदेश लिहिले
कोट दिवाळी हा प्रकाशाचा आणि आनंदाचा सण आहे. या उपक्रमातून विद्यार्थिनींना केवळ हस्तकौशल्यच नव्हे, तर सण साजरा करण्याचा आनंद आणि त्यामागील मूल्ये समजावून सांगण्याचा आमचा प्रयत्न होता. विद्यार्थिनींनी बनवलेले कंदीलांपासूनच शाळेची आकर्षक सजवत करण्यात आली आहे. -योगिता कराळे, अधिक्षिका आसरबारी शासकीय आश्रमशाळा
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV