पुणे, 16 ऑक्टोबर (हिं.स.)।
महापालिकेची परवानगी नसताना पोलिसांच्या सीसीटीव्ही केबलसाठी खोदाई करणाऱ्या ठेकेदाराला महापालिकेने कडक शब्दांत समज देत दिवाळीपर्यंत रस्ते खोदाई थांबवण्याचे आदेश दिले आहेत. आदेशाचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.महापालिकेकडून शहरात विविध सेवा वाहिन्या टाकण्यासाठी शासकीय, निमशासकीय व खासगी संस्थांना सशुल्क परवानगी दिली जाते. पथ विभागाकडून खोदाईसाठी १ ऑक्टोबर ते ३० एप्रिलपर्यंत खोदाईला परवानगी दिली जाते. त्यानंतर पुढील एक मे रोजी खोदाई बंद करून ३१ मेपर्यंत रस्ते दुरुस्त करणे बंधनकारक असते. पथ विभागाकडून पावसाळ्यापूर्वी शहरातील रस्ते दुरुस्त केले जातात. पावसाळ्यात पाण्यामुळे रस्त्यावर पडणारे खड्डे व साचणारे पाणी यामुळे वाहतूक मंदावते. त्यामुळे पावसाळ्यात केवळ अति महत्त्वाच्या, तातडीची निकड अशा कामासाठीच खोदाईची परवानगी दिली जाते. मात्र, पोलिस प्रशासनाने महापालिकेच्या पथ विभागाने परवानगी देण्यापूर्वीच सीसीटीव्ही केबल टाकण्यासाठी ठेकेदारामार्फत खोदाई सुरू केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु