* भगवान भक्तीगड, सावरगाव घाट दसरा मेळावा
बीड, 2 ऑक्टोबर (हिं.स.) - मुंडे साहेबांनी मला जो वसा दिला आहे तो वसा आणि वारसा पुढे नेईन. मी कधीही खाली मान घालायला लावणार नाही. सत्तेत असेन किंवा विरोधात, सामान्य माणसाचं हित माझ्या मनापासून कधीही दूर जाणार नाही. गोपीनाथ मुंडेंचा वारसा चालवत असताना, प्रत्येक जाती-पातीच्या माणसासाठी लढणार असल्याचा निर्धार भाजपा नेत्या मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.
आज विजया दशमीच्या शुभमुहूर्तावर ऐश्वर्यसंपन्न राष्ट्रसंत श्री भगवान बाबा यांची जन्मभूमी असलेल्या भगवान भक्तीगड, सावरगाव घाट येथे दरवर्षीच्या परंपरेनुसार ऐतिहासिक दसरा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.
दोन घास कमी खा, पण स्वाभिमानाने राहा. नका कोणाचे तुकडे उचलू. नका कोणाचे पैसे घेऊ, नका खोटी कामं-खोटे धंदे करू,गुंड पाळू नका, चांगल्या माणसाचं चांगलंच होतं. भगवान बाबांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असतात. मला तुमचा अभिमान आहे, असे आवाहनही मुंडे यांनी केले.
पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षणावर देखील आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला होता, त्यामुळे आपणही मराठा आरक्षणाला पाठिंबा दिल्याचं पंकजा मुडे म्हणाल्या.
“माझ्या मंचावर उपस्थित असलेल्या, निवडून आलेल्या माणसाच्या प्रचाराला गेले, त्याची कधी जात पाहिली नाही. मी शिकलेच नाही जात पाहणं, भेदभाव करणं. कारण भगवान बाबांनी ते शिकवलं नाही. माझ्या बाबांनी ते शिकवलं नाही, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.
याप्रसंगी आ.धनंजय मुंडे, माजी खा.प्रितम मुंडे, माजी मंत्री महादेव जानकर, आ.मोनिकताई राजळे, आ.नारायण कुचे, आ.नमिता मुंदडा, प्रा.लक्ष्मण हाके, ह.भ.प.राधाताई सानप, श्री संत भगवानबाबा स्मारक मंदिर ट्रस्ट सावरगाव (घाट) आणि ग्रामस्थ, ऊसतोड-मजूर संघटनेचे पदाधिकारी, आणि संपूर्ण महाराष्ट्रातुन आलेले, कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis