तामिळनाडू : रा.स्व.संघाच्या 39 स्वयंसेवकांना घेतले ताब्यात
दसरा साजरा केला म्हणून करण्यात आली कारवाई चेन्नई, 02 ऑक्टोबर (हिं.स.) : पोरूर येथील अय्यप्पनथंगल भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 39 स्वयंसेवकांना पोलिसांनी आज, गुरुवारी ताब्यात घेतले. सरकारी शाळेच्या मैदानावर परवानगीशिवाय शाखा आयोजित केल्याचा पोल
नागपुरात पथसंचलन करताना संघ स्वयंसेवक


दसरा साजरा केला म्हणून करण्यात आली कारवाई

चेन्नई, 02 ऑक्टोबर (हिं.स.) : पोरूर येथील अय्यप्पनथंगल भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 39 स्वयंसेवकांना पोलिसांनी आज, गुरुवारी ताब्यात घेतले. सरकारी शाळेच्या मैदानावर परवानगीशिवाय शाखा आयोजित केल्याचा पोलिसांचा आरोप आहे. या कारवाईवर भाजपने तीव्र प्रतिक्रिया दिली असून, स्वयंसेवकांची तत्काळ आणि बिनशर्त सुटका करावी, अशी मागणी केली आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्ताने गुरुपूजन आणि विशेष शाखेचे आयोजन करण्यात आले होते. पोलिसांनी सांगितले की, परवानगी न घेता शासकीय उच्च माध्यमिक विद्यालयाच्या परिसरात कार्यक्रम घेणे नियमबाह्य आहे. शाळेच्या प्रशासनाने पोलिसांकडे अतिक्रमणाची तक्रार दाखल केली होती, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

स्वयंसेवकांना ताब्यात घेतल्यानंतर शासकीय बसद्वारे जवळील सामुदायिक सभागृहात नेण्यात आले, जिथे त्यांची नंतर सुटका करण्यात आली.

भाजपाची प्रतिक्रिया :-

भाजप नेत्या आणि माजी राज्यपाल तमिलिसाई सुंदरराजन यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना म्हटले,

विजयादशमीसारख्या पवित्र दिवशी आरएसएस स्वयंसेवकांवर कारवाई करणे निंदनीय आहे. आज संघाचे शताब्दी वर्ष आहे, आणि हा त्यांच्या साठी एक शुभ दिवस आहे. ते शांततेत प्रार्थना करत होते, मात्र पोलिसांनी अचानक अटक केली.

त्यांनी सरकारवर निशाणा साधत म्हटले की,

राज्यात गुन्हेगार आणि माफिया रस्त्यावर मोकाट फिरत आहेत, पण त्यांच्यावर कारवाई होत नाही. मात्र संघाच्या कार्यक्रमांवर पोलिसांकडून तत्काळ कारवाई केली जाते.

घटनेचा तपशील:-

पोलिसांच्या माहितीनुसार, अय्यप्पनथंगलच्या सरकारी शाळेत आरएसएसच्या वेशात विशेष शाखा प्रशिक्षण व गुरुपूजा आयोजित करण्यात आली होती. ही कार्यक्रम संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त तसेच जनसंघाचे संस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त होता.

मुख्य आरोप असा होता की, कार्यक्रमासाठी कोणतीही पूर्वपरवानगी घेतलेली नव्हती आणि शाळेच्या परिसरात संघाची वर्दी घालून उपस्थित राहणे नियमांचे उल्लंघन आहे.

स्टालिन यांचा विरोध:-

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी आरएसएसच्या शताब्दी वर्षानिमित्त केंद्र सरकारने स्मारक डाकटिकिट आणि नाणं जारी केल्याबद्दल तीव्र विरोध केला.

त्यांनी म्हटले,

महत्मा गांधींच्या जयंती दिवशी आरएसएसची शताब्दी साजरी करणे हा विरोधाभास आहे. गांधीजींच्या हत्येचा विचार करणाऱ्या संघटनेच्या गौरवासाठी टपाल तिकीट आणि नाणे जारी करणे, हे भारताच्या धर्मनिरपेक्षतेला धक्का आहे.

स्टालिन पुढे म्हणाले,

आपला भारत हा सर्व धर्मांना समान वागणूक देणारा धर्मनिरपेक्ष देश आहे. गांधीजींच्या विचारांनुसार समाजात प्रेम, ऐक्य आणि समता प्रस्थापित करणे आपली जबाबदारी आहे.---------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande