आयुष मंत्रालयाकडून राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली, 2 ऑक्टोबर (हिं.स.) - आयुष मंत्रालयाने प्रा. बनवारी लाल गौर, वैद्य नीलकंठन मूस ई.टी. आणि वैद्य भावना प्राशर यांनी आयुर्वेदाच्या क्षेत्रात दिलेल्या शैक्षणिक, पारंपरिक आणि वैज्ञानिक योगदानाची दखल घेत त्यांना राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुर
आयुष मंत्रालयाकडून राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार प्रदान


नवी दिल्ली, 2 ऑक्टोबर (हिं.स.) -

आयुष मंत्रालयाने प्रा. बनवारी लाल गौर, वैद्य नीलकंठन मूस ई.टी. आणि वैद्य भावना प्राशर यांनी आयुर्वेदाच्या क्षेत्रात दिलेल्या शैक्षणिक, पारंपरिक आणि वैज्ञानिक योगदानाची दखल घेत त्यांना राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार 2025 प्रदान केले. हेे पुरस्कार आयुर्वेदाच्या प्रचार, संवर्धन व प्रगतीसाठी प्रभावी योगदान देणाऱ्या व्यक्तिंना सन्मानित करतात. या वर्षीचे पुरस्कार विजेते पारंपरिक विद्वत्ता, सातत्यपूर्ण परंपरा आणि वैज्ञानिक नवकल्पना यांच्या अद्वितीय संगमाचे प्रतिनिधीत्व करतात.

भाषा आणि साहित्यातून आयुर्वेदाला बळकटी देणारे प्रा. बनवारी लाल गौर

प्रा. बनवारी लाल गौर हे विद्वान व शिक्षणतज्ज्ञ असून त्यांचे सहा दशकांहून अधिक काळ आयुर्वेद शिक्षण व संस्कृत अभ्यासात योगदान आहे. त्यांनी 31 पुस्तके आणि 300 हून अधिक शैक्षणिक लेखन केले आहे, यामध्ये संस्कृत भाषेतील 319 प्रकाशनांचा समावेश आहे. त्यांनी 24 पीएचडी संशोधक आणि 48 पदव्युत्तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे.

प्रा. गौर यांच्या योगदानाबद्दल त्यांना राष्ट्रपती सन्मानासह विविध राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

केरळच्या आयुर्वेदिक उपचार वारसा पुढे नेणारे वैद्य नीलकंदन मूस ई.टी.

वैद्य नीलकंदन मूस ई.टी. हे ‘वैद्यरत्नम् समूहा’चे प्रमुख असून 200 वर्षांपूर्वीच्या आयुर्वेदिक परंपरेतील आठव्या पिढीतील वारस आहेत. शंभराहून अधिक वैद्यांच्या समूहाचे नेतृत्व करीत नीलकंदन यांनी केरळच्या पारंपरिक आयुर्वेद पद्धती राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवर पोहोचविण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या उपक्रमांमध्ये मर्मयानम आणि वज्र असे सामुदायिक आरोग्य कार्यक्रम आणि पंचकर्मावरील व्यावहारिक मार्गदर्शक पुस्तिकेचा समावेश आहे.

आयुर्वेदाची पारंपरिक मुळे जपतच बदलत्या काळानुसार त्याला जिवंत परंपरेच्या रूपात पुढे नेण्याचा मार्ग त्यांनी आपल्या कार्यातून दाखविला आहे.

आयुर्वेद व जनुकीय विज्ञानाचा संगम घडविणाऱ्या वैद्य भावना प्राशर

सीएसआयआर-आयजीआयबीतील वैज्ञानिक वैद्य भावना प्राशर यांना आयुर्वेद व जनुकीय विज्ञानाचा संगम म्हणता येईल अशा आयुर्जेनोमिक्स क्षेत्रातील मूलभूत संशोधनासाठी गौरविण्यात आले आहे. त्यांच्या संशोधनाने आयुर्वेदातील प्रकृती आणि त्रिदोष यांसारख्या संकल्पना आधुनिक जनुकीय विज्ञानाशी जोडल्या गेल्या आहेत.

कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि मशिन लर्निंगवर आधारित त्यांनी विकसित केलेल्या प्रकृती विश्लेषण पद्धतींचा राष्ट्रीय प्रकृती परीक्षण कार्यक्रमात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आयुर्वेदाची व्याप्ती सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत वाढविण्यास मदत झाली आहे.

आयुर्वेदातील उत्कृष्टतेचा गौरव

आयुष मंत्रालयाकडून दिले जाणारे राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार हे पारंपरिक भारतीय वैद्यक क्षेत्रातील सर्वोच्च सन्मानांपैकी एक आहेत. या पुरस्कारांचे 2025 मधील विजेते आयुर्वेदाच्या तीन स्वतंत्र पैलूंचे प्रतिनिधित्व करतात. विद्वान संशोधक प्रा. गौर, पारंपरिक वैद्यक परंपरेचा वारसा पुढे नेणारे वैद्य मूस आणि वैज्ञानिक नवोन्मेषी वैद्य प्राशर एकत्रितपणे आयुर्वेदाचे सातत्य आणि उत्क्रांतीचे प्रतीक आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande