स्थानिक स्वराज्य संस्थांवर महायुतीचा भगवा फडवणं हे एकच लक्ष्य - एकनाथ शिंदे
- शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही- ...तर तुमचा मेळावा पाकिस्तानमध्ये घ्या, ठाकरेंवर टीका मुंबई, 2 ऑक्टोबर (हिं.स.) - स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीचा विजय होणं आवश्यक आहे. ग्रामपंचायतीपासून ते महापालिकेपर्यंत सर्वत्र महायुतीचा भगवा फडक
एकनाथ शिंदे दसरा मेळावा


- शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही- ...तर तुमचा मेळावा पाकिस्तानमध्ये घ्या, ठाकरेंवर टीका

मुंबई, 2 ऑक्टोबर (हिं.स.) - स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीचा विजय होणं आवश्यक आहे. ग्रामपंचायतीपासून ते महापालिकेपर्यंत सर्वत्र महायुतीचा भगवा फडकला पाहिजे. मुंबई महापालिकेत महायुती जिंकली नाही, तर मुंबई 25 वर्ष मागं जाईल. स्थानिक स्वराज्य संस्थांवर महायुतीचा भगवा फडवणं हे एकच लक्ष्य आहे. सर्व मतभेद बाजूला ठेवा आणि कामाला लागा, असा कानमंत्र शिवसेना पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी नेते, कार्यकर्त्यांना दिला.

मुंबईतील गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला.

दसऱ्याच्या दिवशी राज्यातील शेतकरी संकटात आहे. त्याचं सावट या सणावर आहे. मात्र शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, दिवाळीपूर्वीच अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणार आहे. लाडकी बहिण योजना कधीही बंद होणार नाही. असे ठामपणे सांगत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार हेच आमचे हिंदुत्व असल्याचे शिंदेंनी स्पष्ट केले.

फेसबुक लाईव्ह करत वर्क फ्रॉम करणारा मी नाही. व्हॅनिटी व्हॅन घेऊन दौरा करणारा मी नाही. जिथे संकट तिथे शिवसेना, मदतीचं धोरण हेच शिवसेनेचं धोरण. तुम्ही गटप्रमुख नाही तर कटप्रमुख आहात, अशा शब्दात शिंदेंनी ठाकरेंना लक्ष्य केले. मुंबई महाराष्ट्रापासून कधीही तोडू देणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर शिंदे यांनी भाषणादरम्यान शिवसेना कार्यकर्त्यांनी पूरग्रस्त भागांत जाऊन तेथील लोकांना कशाप्रकारे मदत केली याचा व्हिडिओ देखील दाखवला.

अयोध्येत राम मंदिर उभारणं, जम्मू काश्मीरमधील 370 कलम रद्द करणं हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं. ते स्वप्न नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केलं. तुम्ही बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करणाऱ्यावर टीका करतात. काही जण आम्हाला मेळावा सुरतमध्ये करा असं म्हणाले. सुरत भारतामध्येच आहे. पण, तुमचा मेळावा पाकिस्तानमध्ये घ्या. आसिफ मुनीरला त्या मेळाव्यात बोलवा. तुमच्या वक्तव्याची पाकिस्तानमध्ये हेडलाईन होते. देशद्रोहाची भाषा बोलणाऱ्या राहुल गांधींच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसता. तुम्हाला आमच्यावर टीका करण्याचा हक्क नाही. तुमचं हिंदुत्व बेगडी आहे, अशी टीकाही शिंदेंनी ठाकरेंवर केली.

मी मुख्यमंत्री झाल्यावर सर्व प्रकल्पांवरील बंदी हटवली. नवी मुंबईतील विमानतळ सुरु होत आहे. मेट्रो 3 सुरु झाली. महाबिघाडी सरकार असतं तर यापैकी एकही प्रकल्प झालं नसतं. आम्ही शेतकऱ्यांना वेळोवेळी मदत केली. तुम्ही मुंबई महापालिकेत जमवलेली माया कुठे गेली, लंडनला गेली का? असा सवाल शिंदे यांनी विचारला. दुष्काळग्रस्तांना आम्ही मदत केली. त्या मदतीवरचे आमचे फोटो विरोधकांना दिसले. पण काम नाही. फोटोग्राफरला फक्त फोटो दिसतात, असा टोला शिंदे यांनी लगावला. मदत करण्यासाठी दानत लागते. एकनाथ शिंदे यांचे दोन्ही हात देणारे आहेत. ही देना बँक आहे, लेना बँक नाही, असं शिंदे यांनी यावेळी सांगितलं.

बळीराजाला मदतीचा हात द्या, असं आवाहन त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना केले. 'जिथे संकट तिथे शिवसेना', 'जिथे संकट तिथे तुमचा हा एकनाथ शिंदे धावून जाणारंच', असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande