पुनर्जागरणाच्या प्रवाहात संघाचे स्थान महत्त्वाचे – दलाई लामा
नागपूर, 02 ऑक्टोबर (हि.स.) : बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त संघाला शुभेच्छा संदेश पाठवला आहे. या संदेशात त्यांनी म्हटले आहे की, राष्ट्रीय पुनर्जागरणाच्या व्यापक प्रवाहात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्थ
दलाई लामा , बौद्ध धर्मगुरू


नागपूर, 02 ऑक्टोबर (हि.स.) : बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त संघाला शुभेच्छा संदेश पाठवला आहे. या संदेशात त्यांनी म्हटले आहे की, राष्ट्रीय पुनर्जागरणाच्या व्यापक प्रवाहात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्थान अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्त्वाचे आहे.

नागपूरमध्ये आयोजित विजयादशमी उत्सवात देश-विदेशातील अनेक मान्यवर उपस्थित होते. काही कारणास्तव दलाई लामा स्वतः कार्यक्रमात सहभागी होऊ शकले नाहीत, मात्र त्यांनी संघासाठी प्रेरणादायी शुभेच्छा संदेश पाठवला, जो कार्यक्रमात वाचून दाखवण्यात आला.

दलाई लामांचा संदेश :-

“पुनर्जागरणाच्या या व्यापक प्रवाहात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने एक विशिष्ट आणि महत्त्वाचे स्थान मिळवले आहे. संघाची स्थापना निष्काम भावनेतून झाली, ज्यामध्ये कर्तव्यबुद्धीची निर्मळ आणि स्पष्ट जाणीव होती – कोणत्याही प्रतिफळाची अपेक्षा न ठेवता.

संघाशी जोडलेला प्रत्येक स्वयंसेवक मनाची पवित्रता आणि साधनांची शुद्धता यावर आधारित जीवन जगण्याचे धडे शिकतो.

संघाचा शंभर वर्षांचा प्रवास समर्पण व सेवाभावाचे एक दुर्मिळ आणि अनुकरणीय उदाहरण आहे. संघाने समाजाला सातत्याने एकत्र आणले असून भारताला भौतिक व आध्यात्मिक दोन्ही दृष्टिकोनांनी बळकट केले आहे.

भारतातील दुर्गम व आव्हानात्मक भागांत संघाने शैक्षणिक व सामाजिक विकास घडवून आणला आहे तसेच आपत्तीग्रस्त भागांमध्ये आवश्यक मदत पुरवली आहे.”

कार्यक्रमात देश-विदेशातील अनेक मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमाला देशविदेशातील विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या. प्रमुख मान्यवरांमध्ये :

लेफ्टनंट जनरल राणा प्रताप कलिता (निवृत्त) – भारतीय लष्कराचे माजी कमांडर, ज्यांनी १९८४ मध्ये कुमाऊं रेजिमेंटमधून सेवा सुरू केली. त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सिएरा लिओन मिशनमध्ये निरीक्षकाची भूमिका पार पाडली आहे.

के. व्ही. कार्तिक – डेक्कन इंडस्ट्रीज, कोयंबतूरचे व्यवस्थापकीय संचालक. भारतातील मोटर पंप उद्योगातील अग्रणी उद्योजक असून सध्या इंडियन पंप मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष आहेत.

संजीव बजाज – बजाज फिनसर्वचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक. बजाज समूहाच्या आर्थिक सेवा क्षेत्राचे नेतृत्व करत असून भारतीय उद्योग परिसंघाचे (CII) माजी अध्यक्ष देखील आहेत.

स्वामी शंकरानंद गिरी – संस्थापक, हिंदू विद्या मिशन, अक्रा (घाना).

डॉ. झ्वेली मखिजे – दक्षिण आफ्रिकेचे माजी आरोग्यमंत्री.

जिम गेराघटी, मेगन मॅकअर्डले, जेसन विलिक, निकोलस क्लेरीमाँ, लैना बेल, माइक वॉटसन, बिल ड्रेक्सेल – वॉशिंग्टन पोस्ट, वॉल स्ट्रीट जर्नल, हडसन इन्स्टिट्यूट यांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांशी संबंधित वरिष्ठ पत्रकार व विश्लेषक.

इंडोनेशिया, थायलंड आणि बाली येथून आलेले वरिष्ठ हिंदू पुरोहित आणि तज्ज्ञ देखील कार्यक्रमात सहभागी झाले होते.

या विशेष प्रसंगी संघाच्या शंभर वर्षांच्या कार्ययात्रेची उजळणी करण्यात आली, ज्यात समाजसेवा, शैक्षणिक विकास, आपत्ती व्यवस्थापन व सांस्कृतिक पुनर्जागरण यामधील त्याच्या योगदानाचे कौतुक करण्यात आले.---------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande