परिवर्तनासाठी लोकशाही मार्गच योग्य – सरसंघचालक
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शतकी विजयादशमी उत्सव थाटात नागपूर, 02ऑक्टोबर (हिं.स.) : हिंसा ही कोणत्याही प्रश्नाचे उत्तर ठरू शकत नाही. समाजपरिवर्तनासाठी केवळ लोकशाही मार्गच शाश्वत आणि योग्य असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.
डॉ. मोहन भागवत नागपूरच्या विजया दशमी उत्सवात मार्गदर्शन करताना


नागपूरच्या विजयादशमी उत्सवात डॉ. मोहन भागवत आणि रामनाथ कोविंद


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शतकी विजयादशमी उत्सव थाटात

नागपूर, 02ऑक्टोबर (हिं.स.) : हिंसा ही कोणत्याही प्रश्नाचे उत्तर ठरू शकत नाही. समाजपरिवर्तनासाठी केवळ लोकशाही मार्गच शाश्वत आणि योग्य असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर आयोजित विजयादशमी आणि शस्त्रपूजन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, प्रांतिक संघचालक दीपक तामशेट्टीवार, सह-संघचालक श्रीधर गाडगे, आणि महानगर संघचालक राजेश लोया प्रमुख्याने उपस्थित होते.

हिंसेचा मार्ग स्वीकारार्ह नाही

भागवत यांनी समाजात द्वेष पसरवण्याच्या षड्यंत्रांवर गंभीर चिंता व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, श्रद्धास्थानांचा अपमान, महापुरुषांचा अवमान आणि कायद्याचा भंग यामार्फत समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशा घटना पूर्वनियोजित असतात व समाजात विघटन घडवून आणण्यासाठी विशिष्ट शक्ती सक्रिय आहेत. त्याच्या जाळ्यात अडकू नये, हे राष्ट्रहितासाठी महत्त्वाचे आहे.

शेजारी देशांतील हिंसक सत्तांतर इशारा

आपल्या शेजारील देशांमधील अस्थैर्याचे दाखले देत भागवत म्हणाले की, श्रीलंका, बांगलादेश, आणि नेपाळ यांसारख्या देशांमध्ये सत्तांतरासाठी हिंसक घटना घडल्या आहेत. अशा प्रकारचे अस्थैर्य भारतात होऊ नये यासाठी जागरूकता आणि सजगतेची गरज आहे. शांतता आणि स्थिरता राखणे हे भारताच्या समृद्धीचे मूलभूत सूत्र आहे.

‘हिंदू’ ही राष्ट्राची ओळख

'हिंदू', 'हिंदवी', 'भारतीय', 'आर्य' हे सर्व समानार्थी शब्द आहेत. परंतु आपल्या राष्ट्राच्या स्वरूपाला निर्देश करणारा 'हिंदू' हा एकमेव स्पष्ट शब्द आहे. आपली संस्कृतीच आपल्या राष्ट्राची खरी ओळख आहे. राज्ये येतात-जातात, पण संस्कृती आणि राष्ट्र अखंड राहतात. म्हणूनच हे राष्ट्र 'हिंदूराष्ट्र' आहे, असे भागवत यांनी स्पष्ट केले.

पहलगाम हल्ल्याचा उल्लेख पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करत, भागवत म्हणाले की 26 निष्पाप हिंदू पर्यटकांच्या हत्येने संपूर्ण देशात शोक आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, या संकटाच्या वेळी लष्कराचे शौर्य, सरकारची त्वरित प्रतिक्रिया आणि समाजाची एकता विशेष उल्लेखनीय ठरली. या पार्श्वभूमीवर त्यांनी आत्मरक्षणाची सजगता आणि मैत्रीपूर्ण परराष्ट्र धोरण यांचा योग्य समन्वय महत्त्वाचा असल्याचे सांगितले.

गांधी विचारांचा गौरव

महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या दिवशी, त्यांचे स्मरण करत भागवत म्हणाले, गांधीजी हे स्वातंत्र्य संग्रामातील शिल्पकार होते. त्यांनी दिलेले मूल्याधिष्ठित विकासाचे विचार आजही तितकेच महत्त्वाचे आहेत. त्यांच्या ‘स्वराज्य’ आणि ‘स्वदेशी’च्या संकल्पना आजच्या भारताला मार्गदर्शक ठरू शकतात. जगात बदलणाऱ्या व्यापारधोरणांचा संदर्भ देत भागवत म्हणाले की, जग परस्परावलंबी आहे, मात्र आत्मनिर्भरतेशिवाय पर्याय नाही. स्वदेशी उत्पादनांचे समर्थन आणि आत्मनिर्भर भारत हेच भविष्यातील ध्येय असावे.

शाखा – नेतृत्व, समजदारी आणि राष्ट्रभक्तीची शाळा

“राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांमधून नेतृत्व, समर्पण, राष्ट्रभक्ती आणि सामाजिक जबाबदारी याचे संस्कार घडतात. समाज एकत्र आल्यास त्याला कोणीही थोपवू शकत नाही. अशा शक्तिशाली समाजासाठी चारित्र्यवान व्यक्ती निर्माण होणे आवश्यक आहे,” असे भागवत म्हणाले.भागवत यांनी शेवटी सांगितले की, “भारतीय संस्कृतीत ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही भावना केंद्रस्थानी आहे. हीच संस्कृती संपूर्ण जगाला दिशा देण्यास समर्थ आहे. भारताने आपली ऐतिहासिक जबाबदारी पार पाडण्यासाठी एकात्मिक आणि मूल्याधिष्ठित विकास मार्ग स्वीकारला पाहिजे.”

-------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande