संघाच्या शताब्दी वर्षातील विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सव नागपूरमध्ये उत्साहात
नागपूर ,02 ऑक्टोबर ( हिं.स.) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, हिंसा ही कोणत्याही प्रश्नाचे उत्तर नाही. समाजात आमूलाग्र बदल घडवायचा असेल, तर तो लोकशाही मार्गानेच शक्य आहे. नागपूर येथील रेशीमबाग मैदानावर संघाच्या शताब्दी वर्षातील विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, प्रांतिक संघचालक दीपक तामशेट्टीवार, सह-संघचालक श्रीधरजी गाडगे आणि महानगर संघचालक राजेश लोया यांची प्रमुख उपस्थिती होती.
समाजात एकतेवर संकट, परंतु तोडगा हिंसा नव्हे
सरसंघचालकांनी समाजात जाणूनबुजून द्वेष पसरवण्याचे षड्यंत्र उघड केले. श्रद्धास्थानांवरील अपमान, महापुरुषांविषयी अपप्रचार आणि कायदा हातात घेण्याच्या घटनांमुळे समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न होत आहे. “अशा घटना पूर्वनियोजित असतात आणि विशिष्ट समुदायाला चिथावणी देण्यासाठी केल्या जातात. त्यांच्या जाळ्यात अडकणे हे देशाच्या हिताच्या विरोधात आहे,” असे ते म्हणाले.
शेजारी देश आणि जागतिक शक्तींसंदर्भातील इशारा
आपल्या शेजारील श्रीलंका, बांगलादेश आणि नेपाळमध्ये सत्तांतर घडवून आणणाऱ्या हिंसक घटना चिंतेचा विषय आहेत. भारतातसुद्धा अशा अस्थैर्य पसरवणाऱ्या शक्ती सक्रिय असून, त्यांना वेळेत ओळखून रोखणे गरजेचे आहे. “आपल्या शेजारी देशांमध्ये शांतता व स्थिरता राखणे ही भारताच्या समृद्धीसाठी अत्यावश्यक बाब आहे,” असे भागवत यांनी अधोरेखित केले.
सामाजिक एकता आणि भारताचे वैश्विक नेतृत्व
सरसंघचालकांनी भारतीय समाजाच्या प्राचीन परंपरा आणि सामाजिक एकतेचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, “आपण विविधतेत एकतेचा जगाला आदर्श दिला आहे. जगासमोरील समस्यांवर भारताच्या समग्र दृष्टिकोनातूनच समाधान मिळू शकते.” त्यांनी भारताने एकात्मिक आणि मूल्याधिष्ठित विकासाचा मार्ग स्वीकारावा, असे मत व्यक्त केले.
ऑपरेशन सिंदूर व स्वदेशीचा आग्रह
काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर 'ऑपरेशन सिंदूर'च्या पार्श्वभूमीवर, भारताच्या समाजाने दाखवलेली एकता आणि लष्कराचे शौर्य कौतुकास्पद असल्याचे सरसंघचालक म्हणाले. अमेरिकेच्या टॅरिफ धोरणाचा संदर्भ देत त्यांनी स्वदेशी आणि स्वावलंबनावर भर दिला. “जग परस्परावलंबी आहे, पण स्वावलंबनाशिवाय पर्याय नाही,” असे ते म्हणाले.
गांधीजींच्या योगदानाचा गौरव
महात्मा गांधी यांचे स्मरण करताना सरसंघचालक म्हणाले, “गांधीजी हे स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख शिल्पकार होते. स्वातंत्र्योत्तर भारताच्या ‘स्व’ आधारित विकास दृष्टिकोनात त्यांचे योगदान मोठे आहे.
------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी