पुणे, 20 ऑक्टोबर (हिं.स.)। पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जागा विक्री प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. धर्मादाय आयुक्तांनी जागा विक्रीच्या व्यवहाराला स्थगिती देण्याचे आदेश दिले आहेत. मुंबईत धर्मादाय आयुक्तांसमोर या प्रकरणाची तातडीची सुनावणी पार पडली. धर्मादाय आयुक्त अमोघ कलोटी यांनी या प्रकरणावर ‘स्टेटस्को’ म्हणजेच परिस्थिती 'जैसे थे' ठेवण्याचा आदेश दिला. त्यामुळे जैन समाजाला दिलासा मिळाल्याचे सांगितले जात आहे. जैन ट्रस्टच्या बोर्डिंगमधील जैन मंदिरालाच गहाण ठेवून कर्नाटकातील बीरेश्वर क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी आणि बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक या दोन संस्थांकडून बिल्डरच्या नावे कर्ज मंजूर करण्यात आले असल्याची बाब समोर आली होती. यानंतर जैन समाजाच्या संघटनांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत धर्मदाय आयुक्तांकडे धाव घेतली.पुण्यातील जैन बोर्डिंग हॉस्टेलची जागा शिवाजी नगरमधील मॉडेल कॉलनीत आहे. हिराचंद नेमचंद दोशी यांनी 1958 साली येथे बोर्डिंगची केली होती. ही जागा काही महिन्यांपूर्वी चर्चेत आली होती. कारण विश्वस्त या जागेवर नियंत्रण ठेवून नवीन विकास करण्यास इच्छूक होते. तर समाजातील काही लोकांनी याला विरोध केला होता. मात्र, काही दिवसांपूर्वीच ही जागा परस्पर हडप करुन तिची विक्री करण्यात आल्याचा आरोप जैन समाजाकडून करण्यात आला. यात गोखले कंट्रक्शनचे नाव पुढे आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु