जळगाव , 20 ऑक्टोबर (हिं.स.) जळगाव जिल्हा हा केळी उत्पादनासाठी देशभर प्रसिद्ध आहे. येथील केळी निर्यातीच्या प्रचंड संधी लक्षात घेता, त्यासाठी आवश्यक इकोसिस्टीम विकसित करण्याची गरज आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चर यांच्या माध्यमातून यासाठी मार्गदर्शन आणि सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन चेंबरचे नवनिर्वाचित अध्यक्ष रवींद्र माणगावे यांनी केले.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चरच्या जळगाव शाखेतर्फे आयोजित एका कार्यक्रमात माणगावे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उद्योग आणि व्यापार वृद्धीसाठी अपेक्षा, मार्गदर्शन आणि चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विश्वस्त मंडळाचे चेअरमन आशिष पेडणेकर, उपाध्यक्षा संगिता पाटील, उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, राष्ट्रीय समन्वयक वेदांशू पाटील, गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य दिलीप गांधी यांच्यासह जिंदाचे अध्यक्ष रवींद्र लढढा, लघुउद्योग भारतीचे सचिव सचिन चोरडिया, फेडरेशन ऑफ इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष शाम अग्रवाल, अनिल झंवर, संजय जैन, तसेच उद्योजक, व्यापारी आणि कृषी क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते. रवींद्र माणगावे यांनी सांगितले की, जिल्ह्यातील प्रत्येक गावातून किमान पाच व्यक्तींना उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. यापैकी एक जरी यशस्वी उद्योजक बनला, तरी जिल्ह्यात हजारो नवे उद्योजक निर्माण होऊ शकतात. यासाठी चेंबरतर्फे इच्छुक तरुणांना प्रशिक्षण आणि मार्गदर्शन दिले जाईल. “देशाला महासत्ता बनवायचे असेल, तर लघुउद्योग आणि उद्योजकांना शासन आणि समाजाने पाठबळ देणे आवश्यक आहे. उद्योगांचा पाया मजबूत झाल्यास आर्थिक विकासाला गती मिळेल,” असेही ते म्हणाले. विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आशिष पेडणेकर यांनी उद्योजकांच्या अडचणींवर मात करण्यासाठी सर्व विभागांचा विचार करून एक सर्वसमावेशक ब्लूप्रिंट तयार करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. यामुळे उद्योग क्षेत्राला नवे दिशादर्शन मिळेल, असे त्यांनी नमूद केले. उपाध्यक्षा संगिता पाटील यांनी जळगाव जिल्हा शेतीसाठी प्रसिद्ध असल्याचे सांगत, शेतीपूरक उद्योग उभारण्यासाठी मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे नमूद केले. डाळ मिल, चटई आणि इतर लघुउद्योग सध्या कार्यरत असले, तरी औद्योगिक विकास अपेक्षेप्रमाणे झालेला नाही. वाहतूक सुविधा आणि कनेक्टिव्हिटी असूनही नव्या उद्योजकांना एमआयडीसीमध्ये जागा मिळत नाही. यासाठी नवीन एमआयडीसी उभारण्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मासिआ अंतर्गत जळगाव जिल्हा विकास परिषदेत केली होती. या घोषणेची अंमलबजावणी व्हावी, यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे, असेही त्या म्हणाल्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गव्हर्निंग कौन्सिल सदस्य अश्विनकुमार परदेशी, धनराज कासट, महेंद्र रायसोनी, अरविंद दहाड, विनोद बियाणी, किरण बच्छाव आणि समन्वयक राहुल बैसाणे यांनी परिश्रम घेतले. दिलीप गांधी यांनी स्वागत केले, सरिता खचणे यांनी सूत्रसंचालन केले, तर अरविंद दहाड यांनी आभार मानले.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर