जळगाव , 20 ऑक्टोबर (हिं.स.) महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा), सिडको आणि वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात फुटबॉल खेळाचा विकास, प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने ‘महादेवा’ ही महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील युवा खेळाडूंना फुटबॉल मध्ये करिअर करण्याच्या दृष्टीने प्रोत्साहन देणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे.या योजनेचा भाग म्हणून राज्यातील तेरा वर्षाखालील मुला-मुलींसाठी जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावर फुटबॉल निवड चाचण्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. या निवड चाचण्यांमधून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना येत्या १४ डिसेंबररोजी मुंबई येथे जागतिक कीर्तीचे फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी यांच्यासोबत खेळण्याची अनोखी आणि अविस्मरणीय संधी मिळणार आहे.जळगाव जिल्ह्यातील निवड चाचणीचे आयोजन गोदावरी फाउंडेशनच्या गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, एमआयडीसी परिसर, जळगाव येथे करण्यात आले आहे. तेरा वर्षाखालील मुलांनी ३० ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठ वाजता आणि तेरा वर्षाखालील मुलींनी ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठ वाजता उपस्थित राहावे. निवड चाचणीसाठी खेळाडूंनी आधार कार्ड आणि जन्म दाखला ही आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत.जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी सर्व शाळा आणि संस्थांना आपल्या फुटबॉलपटूंना या निवड चाचणीत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर