पुणे, 20 ऑक्टोबर (हिं.स.)राज्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतीबरोबरच पशुधनाचे मोठे नुकसान झाले. पूर्वीच्या नियमानुसार केवळ तीन प्राण्यांसाठी मदत दिली जात होती. त्यामध्ये शिथिलता आणून प्रत्येक जनावराच्या मृत्यूची नुकसान भरपाई पशुपालकांना मिळणार आहे.राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे २८ जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पशुधनाचे नुकसान झाले. विविध जिल्ह्यात लहान-मोठे असे एकूण आठ हजार ६७८ जनावरे आणि एक लाख ६४ हजार ८२४ कोंबड्या मृत झाल्या आहेत. या सर्वांना शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागामार्फत नुकसानभरपाई दिली जाणार असून, दुधाळ आणि ओढकाम करणाऱ्या पशुधनाच्या भरपाईवरील तीन प्राण्यांच्या मर्यादा होती. ती आता नसेल. त्यामुळे आता तीनपेक्षा अधिक जनावरांच्या मृत्यूची नुकसानभरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सर्व मृत पशुधनाला शासन निर्णयानुसार नुकसान भरपाईची प्रक्रिया मदत व पुनर्वसन विभागाद्वारे सुरू आहे. पशुसंवर्धन विभागाद्वारे आजारी आणि जखमी पशुधनावर उपचार सुरू आहेत. यामध्ये पशुधनाची रोगप्रतिकारक क्षमता वाढीसाठी लसीकरण हाती घेण्यात आले असून, ६५ लाख ३२ हजार गोवंशीय आणि ३१ लाख २५ हजार म्हैसवर्गीय पशुधनाचे लसीकरण करण्यात आले आहे. तर ७६ लाख ९९ हजार शेळ्या मेंढ्यांचे लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु