सेवामार्गाचा गाणगापूर दत्तपीठावर सत्संग सोहळा दीपोत्सव आणि संगमावर नदी पूजन
नाशिक, 20 ऑक्टोबर (हिं.स.)। - अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे यांच्या पावन सान्निध्यात येत्या शनिवारी (२५ ऑक्टोबर) श्री क्षेत्र गाणगापूर येथील दत्तपीठावर मासिक महासत्संग आयोजित करण्या
सेवामार्गाचा गाणगापूर दत्तपीठावर सत्संग सोहळा दीपोत्सव आणि संगमावर नदी पूजन


नाशिक, 20 ऑक्टोबर (हिं.स.)।

- अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे यांच्या पावन सान्निध्यात येत्या शनिवारी (२५ ऑक्टोबर) श्री क्षेत्र गाणगापूर येथील दत्तपीठावर मासिक महासत्संग आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने भव्य दिव्य दीपोत्सव, श्रीघोर कष्टोद्धारक पादुका पूजन सोहळा, भीमा अमरजा नदी संगमावर पूजन आणि दत्तात्रय वज्रकवच पठण आदी सेवांचेही आयोजन करण्यात आले आहे.

श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील गुरुपीठाप्रमाणेच श्री क्षेत्र गाणगापूर येथे सेवामार्गतर्फे भव्य दत्तपीठ उभारण्यात आले आहे. श्रीमद् गुरुचरित्र ग्रंथातील ४८ व्या अध्यायामध्ये पर्वतेश्वर नामक शेतकऱ्याच्या शेतावर श्री दत्त महाराज कृपादृष्टी टाकतात अशी कथा आहे. त्याच पवित्र जागेवर सेवामार्गाच्या दत्तपीठाची निर्मिती झाली आहे. अशा सदैव दिव्य आणि चैतन्यदायी स्पंदनांनी भारलेल्या दत्तपीठामध्ये २४ ते २६ ऑक्टोबर असे सलग तीन दिवस विविध कार्यक्रम आणि सेवा संपन्न होणार आहेत. विशेष म्हणजे परमपूज्य गुरुमाऊली श्री आण्णासाहेब मोरे यांची पावन उपस्थिती लाभणार असल्यामुळे या सर्व कार्यक्रमांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

श्री क्षेत्र गाणगापूर येथे २४ ऑक्टोबर रोजी भीमा- अमरजा संगमावर नदी पूजनाचा कार्यक्रम होईल. त्याच दिवशी सायंकाळी दत्तपीठावर लक्ष दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघणारा दीपोत्सव साजरा करण्यात येईल. भक्ती ,श्रद्धा आणि प्रकाशाच्या तेजाने भारावलेल्या चैतन्यदायी वातावरणात वेदमंत्रांच्या जयघोषात हा नेत्रदीपक सोहळा याची देही याची डोळा पाहण्याचे भाग्य सेवेकऱ्यांना लाभणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande