पुणे, 20 ऑक्टोबर (हिं.स.)।
पु्ण्यात ऐतिहासिक शनिवारवाड्यात नमाज पठण झाल्याचा आरोप भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी केला आहे. यानंतर मेधा कुलकर्णी यांच्यासह पतीत पावन संघटनेचे पदाधिकारी आक्रमक झाले. या परिसरात असलेल्या मजारवरून मेधा कुलकर्णी आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांच्याकडून जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलनही करण्यात आले.
पुण्यात शनिवारवाड्यात नमाज पठण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी शनिवारवाड्यात नमाज पठण झाल्याचा दावा करत व्हिडीओ शेअर केला. यानंतर शनिवारवाडा परिसरात पतित पावन संघटना आक्रमक झाली. खासदार मेधा कुलकर्णीदेखील या वेळी आंदोलनात सहभागी झाल्या.
या प्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती. दरम्यान याप्रकरणी अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती विश्रामबाग पोलिसांनी दिली.
आंदोलकांकडून परिसरात गोमुत्र शिंपडून जागा स्वच्छ करण्यात आली. यानंतर परिसरात असणाऱ्या एका मजारच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. ही मजार हटवा, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली. परिसरातील तणावाचे वातावरण पाहता पोलिसांचा मोठा फौजफाटा परिसरात तैनात करण्यात आला होता. पोलिसांकडून आंदोलकांची समजूत काढण्याचे प्रयत्न करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु