नाशिक, 21 ऑक्टोबर, (हिं.स.)। : दिवाळी सुरू झाली असून, १६ ते १९ ऑक्टोबरदरम्यान शहरात ३,६६८ टन कचरा एक हजार ६९६ घंटागाड्यांद्वारे उचलून विल्होळीतील खतप्रकल्पावर नेण्यात आला. महापालिकेच्या घनकचरा विभागाने सहा विभागांत नियमित घंटागाड्यांसह २४ अतिरिक्त घंटागाड्या व ३६ ट्रॅक्टर वाढविण्यात आले आहेत. लक्ष्मीपूजनानंतर कचऱ्याचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. दिवाळीपूर्वी घरोघरी साफ-सफाईची कामे केली जात असल्याने कचऱ्याचे प्रमाण दरवर्षी वाढत असल्याचे महापालिकेने म्हटले आहे.
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर वाढणारा कचरा लक्षात घेता, महापालिकेने रोजच्यापेक्षा अतिरिक्त २४ घंटागाड्यांची व्यवस्था केली आहे. दिवाळीत घरोघरी स्वच्छता करण्यात येत आहे. या कालावधीत मोठ्या प्रमाणावर कचरा निघतो. त्यामुळे महापालिकेच्या घंटागाड्यांच्या माध्यमातून संकलित होणाऱ्या कचऱ्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्याने महापालिकेने प्रत्येक विभागात रात्रीच्या वेळी चार ते सहा घंटागाड्या, तसेच किमान सहा अतिरिक्त ट्रॅक्टर उपलब्ध करून दिले आहेत. सहा विभागांत जवळपास ४०५ घंटागाड्या कार्यरत आहेत. या घंटागाड्यांवर जीपीएस यंत्रणेद्वारे नियंत्रण ठेवले जाते. पण अतिरिक्त कचऱ्याकरिता नागरिकांसाठी अधिक घंटागाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. दिवाळीनिमित्त सध्या घरांसह दुकानांची, तसेच सर्वत्र साफसफाई मोहीम सुरू आहे.
यापूर्वी सहा विभागांतून ७०० ते ७१० टन कचरा संकलित केला जात होता. मात्र, दिवाळीसण सुरू होताच चार-पाच दिवसांत कचऱ्याचे प्रमाण साडेनऊशे टनापर्यंत पोचले आहे. यासाठी घंटागाड्यांची संख्या वाढविण्यात आली आहे.
-अजित निकत, संचालक, घनकचरा व्यवस्थापन, मनपा
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV