रत्नागिरी, 21 ऑक्टोबर, (हिं. स.) : रस्त्यावरील खड्ड्यात फटाके वाजवून चिपळूणला सामाजिक कार्यकर्ते शौकत मुकादम यांनी प्रतीकात्मक दिवाळी साजरी केली.
चिपळूण शहरासह ग्रामीण भागात सर्वच रस्त्यांची खड्डे पडून दुर्दशा झाली आहे. मोठमोठे खड्डे पडले असून त्यामुळे अपघात होत आहेत. वाहनचालक व पादचारी यांच्या जीवाला धोका निर्माण झालेला. बांधकाम खात्याच्या विविध विभागांकडे अनेक वेळा मागणी करूनही दुर्लक्ष केले जात आहे. म्हणून यंदाची दिवाळी खड्ड्यात फटाके वाजवून आम्ही साजरी करीत आहोत. या खड्ड्यात वाजवलेल्या फटाक्यांचा आवाज संबंधित अधिकाऱ्यांच्या कानात पोहोचला पाहिजे, अशी अपेक्षा आहे, असे श्री. मुकादम यांनी सांगितले.
यानंतर ताबडतोब खड्डे भरून न झाल्यास यानंतरचे फटाके संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यालयात वाजवले जातील, असा इशाराही माजी सभापती शौकत मुकादम यांनी दिला.
कळंबस्ते येथे झालेल्या या प्रतीकात्मक आंदोलनाच्या वेळी कळंबस्ते सरपंच विकास गमरे, उपसरपंच गजानन महाडीक, ग्रामपंचायत सदस्य विवेक महाडीक, शिरीषदादा शिंदे, दीपक शिगवण, पांडुरंग पिलावरे, हभप चव्हाण बुवा, हळदे, अमेय महाडीक, सौरभ महाडीक, विकास जोरवेकर इत्यादी नागरिक उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी