पनवेल, 21 ऑक्टोबर, (हिं. स.) : कायद्याबद्दल अज्ञान असणे हाच मुळात मोठा गुन्हा आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अस्थितज्ज्ञ डॉ. नितीन म्हात्रे यांनी केले.
ज्येष्ठ पत्रकार कांतीलाल कडू संपादित दैनिक निर्भीड लेखच्या २९ व्या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन डॉ. म्हात्रे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. ते म्हणाले, कोर्टाच्या कामनिमित्त जावे लागल्याने न्यायालयाचा परिचय झाला आणि एके दिवशी न्यायाधीशांनी मला कायद्याविषयी विचारले. संवाद झाला. परंतु, न्यायाधीशांनी त्यावेळी सांगितले की, कायद्याविषयी अज्ञान असणे हाच मुळात मोठा गुन्हा आहे. कायदाविषयक दिवाळी अंक प्रसिद्ध करून कांतीलाल कडू यांनी मैलाचा दगड पार केला आहे. आजकाल सायबर गुन्ह्याचे प्रमाण वाढले आहे. ज्येष्ठांची मोठी फसवणूक होत असल्याच्या गुन्हेगारीचा आलेख प्रचंड वाढताना दिसत आहे. त्यावरही कांतीलाल कडू यांनी विशेष अंक प्रकाशित करावे.
एम. जी. एम. हॉस्पिटल आणि कॉलेज रिसर्च सेंटरच्या अधिष्ठात्या निर्मला कासेकर, शिवसेनेचे उपनेते बबनदादा पाटील, ब्लॅक पँथरचे नेते जगदीश गायकवाड, ज्येष्ठ काँग्रेस नेते डॉ. भक्तिकुमार दवे, उद्योजक विजय लोखंडे, सरकारी वकील आणि कविवर्य वाय. एस. भोपी, ज्येष्ठ संपादक सुनील पोतदार, रमेश भोळे आदींची भाषणे झाली. व्यासपीठावर त्यांच्या समवेत अॅड. प्रफुल्ल म्हात्रे आणि हॉटेल व्यावसायिक सुरेशशेठ फडके उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी