परभणी : झेंडूचा दर कोसळला; शेतकऱ्यावर पुन्हा नैराश्याचे सावट
परभणी, 21 ऑक्टोबर, (हिं.स.)। दिवाळीच्या आनंदोत्सवात शहर उजळले असले तरी शेतकरी मात्र दुखा:त आहेत. परभणी शहरात व वसमत रोड परिसरात हजारो झेंडू फुलांचे स्टॉल उभे राहिले असले तरी बाजारात फुलांचा दर कोसळल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. शहरात वि
झेंडूचा दर कोसळला; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा नैराश्याचे सावट


परभणी, 21 ऑक्टोबर, (हिं.स.)। दिवाळीच्या आनंदोत्सवात शहर उजळले असले तरी शेतकरी मात्र दुखा:त आहेत. परभणी शहरात व वसमत रोड परिसरात हजारो झेंडू फुलांचे स्टॉल उभे राहिले असले तरी बाजारात फुलांचा दर कोसळल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

शहरात विविध ठिकाणी जवळपास एक हजारांहून अधिक झेंडू फुलांचे स्टॉल उभे राहिले आहेत. मात्र, फुलांचा भाव अत्यंत घसरला असून सकाळच्या सत्रात झेंडू फक्त २० रुपये किलो या दराने विक्रीस आहे. काही ठिकाणी दुपारी दर १० रुपयांवर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. “फुलं विकून दिवाळी साजरी करायची, अशी आशा होती. पण इतका कमी दर मिळतोय की वाहतूक खर्चही निघत नाही,” असा उद्विग्न सूर एका शेतकऱ्याने व्यक्त केला.

दुपारी शहरातील अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला विक्री न झाल्यास झेंडू फुलांचे प्रचंड ढिगारे दिसतील. विक्री न झाल्याने काही शेतकऱ्यांना फुलं टाकून द्यावी लागतात. “बाजारात ग्राहक आहेत, पण खरेदीदार नाहीत. सगळे दर विचारून मागे फिरतात,” असे शेतकरी सांगतात.

या हंगामात अतिवृष्टीमुळे आधीच पिकांचे मोठे नुकसान झाले. शासनाकडून मिळालेली मदत तुटपुंजी असल्याने शेतकऱ्यांची दिवाळी आधीच मळकटली होती. त्यात फुलबाजारात झालेल्या दरकपातीने त्यांच्या आशेचा शेवटचा किरणही मंदावला आहे. एक वृद्ध शेतकरी निराशपणे म्हणाले, “नको रे बाबा, तो शेतकऱ्यांचा जन्म! कसली दिवाळी, कसले काय? आम्ही फुलं विकायला आलो, पण उपाशी परत जाण्याची वेळ आली.”

झेंडू फुलांच्या दरात झालेली घसरण केवळ बाजारपेठेतच नव्हे, तर ग्रामीण भागातही परिणाम करते. विक्री न झाल्याने शेतकऱ्यांकडे पैसे नसतात. परिणामी त्यांच्या घरातील लहान मुलेही ऐन दिवाळीत नव्या कपड्यांशिवाय, फराळाशिवाय ही दिवाळी साजरी करावी लागणार अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande