मुंबई, 21 ऑक्टोबर (हिं.स.)।दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्र उजळून निघाला असताना नवी मुंबईत मात्र दुर्देवी घटना घडली आहे. कामोठे येथील एका सोसायटीत सिलिंडरचा स्फोट झाल्याने लागलेल्या भीषण आगीत आई-मुलीचा होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कामोठे येथील सेक्टर 36 मधील आंबे श्रद्धा सोसायटीच्या रूम क्रमांक 301 मध्ये रविवारी(दि.१९) रात्री अचानक आग लागली. स्थानिकांनी धूर आणि ज्वाळा पाहताच तात्काळ बाहेर धाव घेतली आणि अग्निशमन दलाला फोन करून घटनेची माहिती दिली. यानंतर अग्निशमन दलाच्या पाच गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि जवानांनी इमारतीच्या वर चढून पाण्याचा मारा सुरू केला. अखेर एक तासाहून अधिक काळानंतर आग विझवण्यात आली.
अग्निशमन दलाच्या प्राथमिक तपासानुसार, घरातील दोन गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागली. या स्फोटामुळे दुसऱ्या मजल्यावरील संपूर्ण घर उद्ध्वस्त झाले. त्या वेळी घरात तीन सदस्य होते. त्यापैकी दोघांनी तात्काळ बाहेर पडून आपले प्राण वाचवले, मात्र आई आणि मुलगी आतमध्ये अडकल्या आणि यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. शेवटी आग आटोक्यात आल्यानंतर दोघींचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. ही दुर्घटना घडली त्या वेळी परिसरात दिवाळी सणाचा उत्साह होता.
प्राथमिक अहवालानुसार, सिलिंडर लिकेज आणि स्पार्कमुळे स्फोट झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, नेमके कारण समजण्यासाठी तांत्रिक तपास सुरू आहे. कामोठे पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत. मृतांची ओळख पटली असून, दोघी आई-मुलगी असल्याची पुष्टी पोलिसांनी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode