नंदुरबार, , 21 ऑक्टोबर (हिं.स.) “कर्तव्यनिष्ठा, शौर्य आणि बलिदानाला नमन करण्यासाठी आपण आज एकत्र आलो आहोत, देशाच्या सीमा आणि समाजाच्या सुरक्षेसाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या प्रत्येक जवानाला हा दिवस अभिवादनाचा आहे,” अशा शब्दांत राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी पोलीस स्मृती दिनानिमित्त शहिद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. ते आज जिल्हा पोलीस मुख्यालयात आयोजित पोलीस स्मृती दिन समारंभात बोलत होते. या प्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस., अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, अप्पर पोलीस अधीक्षक अशीत कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन तहसीलदार प्रमोद पवार, पोलीस अधिकारी, कर्मचारी व शहिद जवानांचे नातेवाईक उपस्थित होते. पालकमंत्री ॲड. कोकाटे म्हणाले, “या पवित्र दिनामागील इतिहास अतिशय प्रेरणादायी आहे. 21 ऑक्टोबर 1959 रोजी लडाखमधील ‘हॉट स्प्रिंग्स’ या थंड बर्फाळ प्रदेशात भारताच्या सीमा रक्षक दलाच्या दहा जवानांवर चिनी सैन्याने हल्ला केला. आपल्या प्राणाची पर्वा न करता त्यांनी शत्रूशी झुंज दिली आणि देशासाठी बलिदान दिले. त्या तेजस्वी क्षणाची आठवण म्हणून 21 ऑक्टोबर हा दिवस देशभर ‘पोलीस स्मृती दिन’ म्हणून साजरा केला जातो.” पालकमंत्र्यांनी पुढे सांगितले की, “1 सप्टेंबर 2024 ते 21 ऑगस्ट 2025 या कालावधीत कर्तव्य बजावत असताना एकूण 191 पोलीस अधिकारी व अंमलदार धारातीर्थ पडले आहेत. त्यांच्या कर्तव्यपरायणतेला, त्यागाला आणि देशसेवेला आपण सर्वांनी मनःपूर्वक नमन करावे.” त्यांनी शहिदांच्या कुटुंबियांप्रती राज्य सरकार व जिल्हा प्रशासन सदैव सोबत असल्याचा विश्वासही व्यक्त केला. पालकमंत्री ॲड. कोकाटे यांनी आवाहन केले की, “पोलीस दल समाजाच्या सुरक्षेचा कणा आहे. सामाजिक शांतता, कायदा व सुव्यवस्थेचे पालन आणि नागरिकांच्या सुरक्षेची हमी देणारे हे दल नेहमी जनतेचा विश्वास जपते. शहिद जवानांच्या प्रेरणेने प्रत्येक पोलीस अधिकारी आपले कर्तव्य अधिक निष्ठेने पार पाडेल, अशी मला खात्री आहे.” समारंभाच्या शेवटी शहिद जवानांच्या स्मृतीस पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. दोन मिनिटांचे मौन पाळून उपस्थित सर्व अधिकारी व नागरिकांनी त्यांना अभिवादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस., यांनी केले. जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात शिस्त, आदर आणि कृतज्ञतेची भावना संवेदनशीलतेने जाणवत होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर