पुणे, 21 ऑक्टोबर, (हिं.स.)। पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सात गावांतील किरकोळ गटवगळता मोजणीप्रक्रिया पूर्ण झाली आहे. यापूर्वी ड्रोन सर्वेक्षण पूर्ण झाल्यामुळे विमानतळाच्या पुढील प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता असून, येत्या काही दिवसांमध्ये प्रत्यक्ष भूसंपादन जिल्हा प्रशासनाकडून सुरू करण्यात येणार आहे.
पुरंदर विमानतळासाठी कुंभारवळण, वनपुरी, खानवडी, उदाचीवाडी, मुंजवडी, एखतपूर आणि पारगाव अशा सात गावांमधून १ हजार २८५ हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. त्यासाठी २६ सप्टेंबरपासून सात गावांमधून मोजणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मोजणीसाठी जिल्हा प्रशासनाने पाच पथके तयार केली होती. त्या पथकामार्फत ही मोजणी पू्र्ण करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यासाठी भूसंपादन अधिकारी समन्वयक डॉ. कल्याण पांढरे, उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, तसेच भूसंपादन अधिकारी डॉ. संगीता चौगुले-राजापूरकर या तीन अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात ही मोजणीप्रक्रिया पूर्ण करण्यात आली.पारगाववगळता उर्वरित गावांमध्ये मोजणीची प्रक्रिया शातंतेत पूर्ण झाली. पारगावात काही शेतकऱ्यांनी मोजणी करण्यास विरोध दर्शविला. त्यामुळे त्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा गट वगळता जिल्हा प्रशासनाने मोजणी पूर्ण केल्याची माहिती जिल्हा प्रशानसाकडून देण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु