पुणे, 21 ऑक्टोबर (हिं.स.)। पद्मश्री किताब मिळालेल्या सिंधूताई सपकाळ यांचा निराश्रितांची सेवा करण्याचा वारसा ममताताईंनी त्याच जोमाने पुढे सुरू ठेवला आहे, असे गौरवोद्गार महाराष्ट्राचे माजी प्रधान सचिव महेश झगडे यांनी काढले.तुकाईदर्शन येथील लोककल्याण प्रतिष्ठानच्या वतीने ‘23वा लोककल्याण भूषण’ पुरस्कार झगडे यांच्या हस्ते ममताताई सपकाळ यांना प्रदान करण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते.
या प्रसंगी माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी पं. स. सदस्य शंकर हरपळे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजाभाऊ होले, हरिश्चंद्र कुलकर्णी, दिलीप भामे, इंद्रपाल हत्तरसंग, पांडुरंग शेंडे, सागर पिलाणे, राजू गर्जे, प्रशांत सुरसे, के. टी. आरू, नितीन आरू, राजाराम गायकवाड, प्राची देशमुख उपस्थित होते.शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व मानपत्र, असे पुरस्काराचे स्वरूप होते. सुषमा सावळगी यांनी ममताताईंना साडी-चोळी भेट दिली. सत्काराला उत्तर देताना ममताताई म्हणाल्या की, माझ्याच घरात माझ्याच लोकांनी माझ्या कार्याचे कौतुक केले, यामुळे मी भारावून गेले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु