परभणी, 21 ऑक्टोबर (हिं.स.)। हुतात्मा दिनानिमित्त परभणी पोलीस मुख्यालय येथे आयोजित कार्यक्रमात देशासाठी प्राणार्पण केलेल्या शूर जवानांना आणि कर्तव्य बजावताना वीरगती प्राप्त केलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचार्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.या कार्यक्रमास पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नितीशा माथुर यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी “देशासाठी प्राणार्पण करणारे हे खरे हुतात्मे आहेत. त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. त्यांच्या त्यागातून प्रत्येक नागरिकाला कर्तव्याची जाणीव होणे, हाच हुतात्मा दिन साजरा करण्यामागचा खरा हेतू आहे,” असे प्रतिपादन केले. दि. २१ ऑक्टोबर १९५९ रोजी लडाखमधील हॉटस्प्रिंग येथे भारत-चीन सीमारेषेवर केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या १० जवानांच्या तुकडीवर चीनी सैन्याने अचानक हल्ला केला होता. समुद्रसपाटीपासून तब्बल १६ हजार फूट उंचीवर, हिमालयाच्या बर्फाच्छादित प्रदेशात या जवानांनी शेवटच्या श्वासापर्यंत शौर्याने लढा दिला आणि वीरमरण पत्करले. या घटनेने संपूर्ण देश शोकसागरात बुडाला होता. त्या शूर जवानांच्या बलिदानाच्या स्मृती म्हणून दरवर्षी २१ ऑक्टोबर हा दिवस “हुतात्मा दिन” म्हणून साजरा केला जातो.
१ सप्टेंबर २०२४ ते ३१ ऑगस्ट २०२५ या कालावधीत देशभरातील विविध पोलीस दलातील १९१ पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी कर्तव्य बजावताना आपले प्राण देशासाठी अर्पण केले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देशभरात हुतात्मा दिन साजरा करून शहीद पोलीस जवानांना श्रद्धांजली वाहण्यात येते.
परभणी पोलीस मुख्यालयात हुतात्मा स्मृतीस्तंभावर पुष्पचक्र अर्पण करून शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्व उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून शहिदांना अभिवादन केले. पोलीस दलातील जवानांनी दिलेली शौर्याची आणि राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा प्रत्येक भारतीयासाठी दीपस्तंभासारखी असल्याचे यावेळी मान्यवरांनी नमूद केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis