रायगड, 21 ऑक्टोबर (हिं.स.)। खासदार सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय व खंदे समर्थक, बहुजन समाजाचे लोकप्रिय नेते विकासदादा गायकवाड यांनी शिवसेना (शिंदे) गटात पक्षप्रवेश केला आहे. हाद कार्यक्रम दिपावलीच्या शुभ मुहूर्तावर लोकप्रिय मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत सुमारे २०० समर्थकांसह पार पडला. या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची चिन्हे दिसत आहेत.
विकासदादा गायकवाड हे गोरेगाव बत्तिशी विभागातील बौद्ध समाजाचे अध्यक्ष असून, नुकतेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे येथून सहायक कुलसचिव पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांनी शेतकरी, कामगार आणि सामान्य बहुजन समाजासाठी दीर्घकाळ प्रामाणिक सामाजिक सेवा केली आहे. त्यांचे वडील, दिवंगत शंकरराव गायकवाड, गोरेगावचे तत्कालीन सरपंच व जिल्हा परिषदेचे दोन वेळा सदस्य होते.
या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर, संपर्क प्रमुख अरुण चाळके, युवा सेना जिल्हा अध्यक्ष विपुल उभारे, तालुका अध्यक्ष ॲड. महेंद्र मानकर, जिल्हा महिला अध्यक्ष नीलिमा घोसाळकर तसेच माजी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. बत्तीस गावातील समाज आणि सामाजिक कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.
राजकीय तज्ज्ञांच्या मते, विकासदादा गायकवाड यांच्या पक्षप्रवेशामुळे गोरेगाव जिल्हा परिषदेतील राजकीय समीकरणे बदलू शकतात. आगामी निवडणुकीत गोरेगाव विभागातील मतदारांवर याचा ठळक परिणाम होण्याची शक्यता असून, शिवसेना (शिंदे) गटाचा पक्षीय बळ अधिक दृढ होईल अशी चर्चा आहे.
विकासदादा गायकवाड यांचा हा निर्णय बहुजन समाज आणि ग्रामीण मतदारांमध्ये मोठा प्रभाव पाडेल, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक प्रभावावरही मोठा परिणाम होईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके