ठाणे, 21 ऑक्टोबर, (हिं.स.) : ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे 'स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी' या जनजागृती मोहिमेच्या अनुषंगाने ठाणे शहरातील प्रमुख बाजारपेठांतील व्यावसायिकांना उप- स्वच्छता निरीक्षक आणि स्वच्छता निरीक्षकांमार्फत दिवाळी शुभेच्छा पत्रांचे वितरण करण्यात येत आहे. या उपक्रमाचा उद्देश व्यावसायिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करणे आणि सणासुदीच्या काळात सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्याचे महत्त्व अधोरेखित करणे हा आहे.
या शुभेच्छापत्रांमध्ये दिवाळीच्या पारंपरिक शुभेच्छा तसेच स्वच्छ बाजार या श्रेणीअंतर्गत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. व्यावसायिकांनी आपल्या परिसरात स्वच्छता राखून, कचरा वर्गवारी करून, कापडी पिशवी वापराचा प्रचार, स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देऊन व आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी जनजागृतीपर फलक लावून स्वच्छ सर्वेक्षणात सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे यांनी दिली.
ठाणे महानगरपालिका सहभागी असलेल्या स्वच्छ भारत अभियान आणि माझी वसुंधरा अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे शहरात स्वच्छतेचा उत्सव साजरा होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर