
जळगाव , 27 ऑक्टोबर (हिं.स.) | घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावत जामनेर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने बिस्मिल्ला नगर येथील रहिवासी अकरम शहा या गुन्हेगाराला अटक केली आहे. अकरम शहा हा पोलिस अभिलेख्यातील सराईत गुन्हेगार असून त्याच्याकडून ७४,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शहापूर (ता. जामनेर) येथील सुरेश रामदास डोंगरे यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून रोख रक्कम, दागिने आणि मोबाईल फोन असा ऐवज चोरून नेला होता. या घटनेप्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक मुरलीधर माधव कासार यांनी आपल्या सहकाऱ्यांसह कसून घेतला. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी अकरम शहा यास शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिसी खाक्या दाखवताच अकरम शहाने रोख, सोने व मोबाईल असा एकूण ७४,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांकडे सुपूर्द केला. ही कारवाई पोलीस निरीक्षक मुरलीधर माधव कासार यांच्या मार्गदर्शनाखाली केली गेली.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर