
बीड, 30 ऑक्टोबर (हिं.स.)।
गरीब मजुरांना पैशाचे आमिष खवून बीड जिल्ह्यात आणले होते. मात्र सामाजिक कार्यकर्त्याने प्रशासनाच्या मदतीने सात जणांची सुटका केली असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे.
या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार पालघर जिल्ह्यातील गरीब मजुरांना पैशांचे आमिष दाखवून बीड जिल्ह्यात आणले. त्यानंतर त्यांच्या अल्पवयीन मुला-मुलींकडून घरकाम व शेतीचे काम करवून घेण्यात येत होते. अवघ्या तीन वर्षाच्या चिमुलीलाही भांडी घासायला लावले.
याचा पर्दाफाश सामाजिक कार्यकर्ते तत्त्वशील कांबळे यांनी प्रशासनाच्या मदतीने केला. यात सात जणांची सुटका करण्यात आली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील बालमजुरांचा मुद्दा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला.
पालघर जिल्ह्यातील एका व्यक्तीने त्यांचा भाऊ, त्याची पत्नी आणि मुलांना आणून बंदिस्त ठेवल्याचे सांगितले. तत्त्वशील कांबळे यांनी थेट जिल्हाधिकारी, बीड यांची भेट घेतली. जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या अधिकारी अनिता कदम, सरकारी कामगार अधिकारी अजय बळीराम लव्हाळे, राहुल उबाळे, तहसीलदार सुरेश घोळवे आणि शिरूर कासार पोलिस ठाण्याचे सपोनि. जाधव यांच्यासह एक पथक तातडीने तागडगाव येथे दाखल झाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis