
जळगाव, 30 ऑक्टोबर, (हिं.स.) - मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा–काकोडा परिसरातील पूर्णा नदीपात्रात दिवसाढवळ्या सुरू असलेल्या अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीवर महसूल विभागाने मोठा घाला घालत तहसीलदार गिरीश वखारे यांच्या नेतृत्वाखाली चार डंपर जप्त केले. या धडक कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. पूर्णा नदीपात्रातून अवैधरीत्या वाळू काढून ती ट्रॅक्टर आणि डंपरच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यात पाठवली जात असल्याची खात्रीलायक माहिती तहसीलदार वखारे यांना मिळताच महसूल पथकाला घटनास्थळी पाठवण्यात आले. तपासणीदरम्यान कुऱ्हा–मलकापूर रस्त्यावरील धुपेश्वरजवळील पुलापासून काही अंतरावर असलेल्या पिंप्राळा शिवारात वाळू उपसा आणि वाहतूक सुरू असल्याचे आढळून आले. तहसीलदार वखारे यांनी तत्काळ पथकासह छापा टाकताच, वाळू वाहतूक करणारे चालक डंपर जागीच सोडून पसार झाले.
महसूल अधिकाऱ्यांनी चार डंपर ताब्यात घेतले असून ते मलकापूर तालुक्यातील असल्याचे समजते. या कारवाईदरम्यान मोठी गर्दी झाल्याने पोकॉ सागर सावे, अंकुश बावस्कर, सुनील मोरे आणि मंगेश सुरळकर यांनी गर्दी नियंत्रणात आणली. या प्रकरणानंतर तहसीलदार वखारे यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, अशी अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी सतत मोहिमा राबवण्यात येतील. तसेच वाळूमाफियांना मदत करणाऱ्या आणि त्यांच्या वाहनांना शेतातून रस्ता देणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर महसुली बोजा टाकण्यात येईल; तर ज्या जमिनीवर आधीच बोजा आहे, त्या थेट सरकारजमा करण्याची कारवाई करण्यात येईल.
दरम्यान, महसूल विभागाच्या या धडक कारवाईचे जनतेतून स्वागत होत असून कुऱ्हा, थेरोळा, रिगाव, पिंप्राळा, कोहाळा, बोदवड आणि काकोडा परिसरातील अवैध वाळू साठ्यांवर तसेच रात्रीच्या वेळेस होणाऱ्या वाळू तस्करीवरही तत्सम कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर