
नांदेड, 27 ऑक्टोबर (हिं.स.)। नांदेड–नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील पार्डी टोलनाक्यावर अमानुष प्रकार घडला असल्याची माहिती मिळाली आहे.
टोलनाक्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी एका महिला रुग्णासह असलेल्या वाहनाला टोल भरण्याच्या वादात तब्बल अर्धा तास अडवून ठेवले. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता प्रसारमाध्यमांवर व्हायरल झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अर्धापूर तालुक्यातील देळूबू येथील महिला रुग्ण खासगी वाहन घेऊन मळमनुरी येथील रुग्णालयाकडे जात होती. मात्र पार्डी येथील टोलनाक्यावर कर्मचाऱ्यांनी हे वाहन टोल भरण्याच्या कारणावरून अडवून ठेवले. त्यामुळे रुग्णाच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली.
राष्ट्रीय महामार्गावरील जबाबदारीच्या ठिकाणी अशा प्रकारची निष्काळजी आणि अमानुष वागणूक देणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे नागरिकांनी सांगितले. रुग्णाला रुग्णालयात लवकर पोहोचण्याची गरज असताना टोल कर्मचाऱ्यांच्या वर्तनामुळे मोठा विलंब झाला. या घटनेबाबत चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis