
जळगाव, 27 ऑक्टोबर (हिं.स.) चाळीसगाव-कन्नड मार्गावर रविवारी पहाटे भीषण दरोड्याची घटना घडली. पुण्याकडे जात असलेल्या पाचोरा येथील डॉक्टर कुटुंबावर सात ते आठ दरोडेखोरांनी हल्ला करून सुमारे ₹१ लाख २० हजारांचा ऐवज लुटला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. डॉ. योगेश नेताजी पाटील (३८, रा. महावीर पार्क, पाचोरा) हे पत्नी नुतन पाटील, भाऊ दिनेश पाटील, दाजी भरत पाटील व चालक भूषण पाटील यांच्यासह कार (एमएच १९ सीव्ही ६४८६) ने पुण्याकडे जात होते. पहाटे ४.१५ वाजता रांजनगाव फाट्याजवळील नायरा पेट्रोलपंपाजवळ अचानक गाडीला काहीतरी अवजड वस्तू आदळल्याचा आवाज आला. गाडी थांबवून तपासणी करत असतानाच सात ते आठ अनोळखी इसम हातात लाकडी काठ्या घेऊन गाडीवर धावून आले. सर्वांनी काळे कपडे घातले होते व चेहऱ्यावर रुमाल बांधलेले होते. त्यांनी डॉक्टर पाटील आणि त्यांच्या भावासह कुटुंबातील इतरांना मारहाण करून सोन्याचे दागिने, मोबाइल, लॅपटॉप व रोख रक्कम असा ऐवज हिसकावून घेतला आणि पसार झाले. एकूण १.२० लाखांचा ऐवज लुटला गेला असून, त्यात ९ ग्रॅम सोन्याचे दागिने (४५,०००), डेल कंपनीचा लॅपटॉप (२०,०००), आयफोन-१३ मोबाइल (३०,०००), रेडमी व वनप्लस मोबाइल (१५,०००) आणि ९,००० रोख रक्कम असा समावेश आहे. घटनेनंतर डॉक्टर पाटील यांनी तत्काळ पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असून, दरोडेखोरांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज आणि हायवेवरील टोल नोंदी तपासण्यास सुरुवात केली आहे. या घटनेने चाळीसगाव-कन्नड मार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, परिसरात भीतीचे वातावरण आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर